IAS Probationer Pooja Khedkar पुणे : कोट्यवधींच्या संपत्तीने चर्चेत आलेल्या वादग्रस्त आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली असतानाच त्यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. केवळ पूजा खेडकरच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांचे देखील अनेक कारनामे आणि अरेरावी संदर्भातील प्रकार समोर आलं आहे. नुकतेच पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी बारामतीसह मुळशीमध्येही (Mulshi) अरेरावी आणि दमदाटी करुन अनेक जमीन खरेदी केल्याचं समोर आलं आहे. या संदर्भातील माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणली आहे. हे प्रकरण ताजे असताना आता पुण्यातील बाणेर रोडवर असलेल्या पूजा खेडेकरांचा बंगला देखील वादाच्या बोवाऱ्यात  संपडण्याची शक्यता आहे.  

  


पूजा खेडकरांच्या अडचणीत आणखीन वाढ 


पुणे महानगरपालिकेचे पथक  बाणेर रोडवर असलेल्या पूजा खेडेकरांच्या  बंगल्याची पाहणी करणार आहे.  पुण्याच्या बाणेर रोड परिसरात खेडेकरांचा बंगला आहे. पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून या बंगल्याची पाहणी करण्यात येणार आहे. तसेच या बंगल्यात काही अनधिकृत बांधकाम आढळल्यास त्यावर कारवाई करणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. पुण्यातील महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे एक पथक पुण्यातील या ओमदीप बंगल्याची पाहणी सध्या करत आहे. 


दुसरीकडे पूजा खेडकर ज्या बाणेर परिसरातील नॅशनल हाऊसिंग सोसायटीत राहतात त्या सोसायटीचे  मॅनेजर दत्ता माळी यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, खेडकर यांच्या बंगल्याबाहेर अनधिकृत बांधकाम बांधकाम करुन त्यांनी त्यावर झाडे लावली. मात्र या अनधिकृत बांधकामाचा सोसायटीशी कुठलाही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.


बंगल्यात अनधिकृत बांधकाम आढल्यास कारवाईचा बडगा 


पुण्यातील अतिशय पॉश परिसरात वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडेकर यांचा ओम दीप या नावाने बंगला आहे. पुण्यातील नॅशनल सोसायटी या परिसरात हा बंगला असून पुण्यातील अतिक्रमण विभागाचे पथक या बंगल्याची पाहणी करण्यासाठी रवाना झाले आहे. या बंगल्यासमोर जे पार्किंग आणि गार्डन आहे ते पूर्णपणे रस्त्याच्या फुटपाथवर आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या पादचारी मार्गासाठी बांधण्यात आलेल्या फुटवाटवरील हे सर्व बांधकाम पाडण्यात येणार असल्याची देखील माहिती पुढे आली आहे.


काही वेळातच पुणे महानगरपालिकेचे  पथक जेसीबीसह येथे दाखल होणार आहे. यात फुटपाथवरील बांधकाम व्यतिरिक्त ही अन्य काही अनधिकृत बांधकाम आढळून आल्यास त्यावर देखील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासाठी पाच जणांचे पथक नेमण्यात आले असून या बंगल्याची त्यांच्याकडून पाहणी करण्यात येणार आहे.


काय आहे प्रकरण?


डॉ. पूजा खेडकर या 2023  च्या आयएएस बॅचच्या अधिकारी आहे. अजून त्यांच्या कारकीर्दीला नीट सुरुवातही झाली नाही पण अवघ्या काही महिन्यांतच त्या चर्चेचा विषय बनल्यात.  प्रोबेशनवर रुजू होण्याआधीच पूजा खेडकरांच्या डोक्यात पदाची हवा गेली होती. रुजू होण्यापूर्वीच स्वतंत्र केबिन, कार, शिपाई आणि निवासस्थानाची मागणी केली. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसण्याची सूचना फेटाळली. अप्प्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्याच केबिनचा जबरदस्तीनं ताबा मिळवला. स्वतःच्या खासगी ऑडी कारवर सरकारी वाहनांवरचा लाल दिवा लावत होत्या . प्रोबेशनवर असलेल्या अधिकाऱ्याला हे सगळं मिळणं नियमबाह्य असतानाही त्यांनी वडिलांच्या मदतीनं ते सगळं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि अखेर त्यांची बदली वाशिममध्ये करण्यात आली.


इतर महत्त्वाच्या बातम्या