आयुष्यात कधी संधी मिळाली नाही तरी, सकाळ –दुपार- संध्याकाळ संधी घेतली जाते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी एकदा निवडणूक लढवावी, मग त्यांना समजेल, असं थेट आव्हान शरद पवारांनी दिलं.
चंद्रकांत पाटील पुणे पदवीधरमतदार संघातून निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, असं पवार म्हणाले.
साखर उद्योग संकटात
सध्या देशातील साखर उद्योग संकटात आहे. त्यामुळे साखरेवर 60 टक्के अधिभार लावा आणि ही रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्या, अशी मागणी शरद पवार यांनी केली.
निर्यात वाढवा
सध्या साखरेचं गरजेपेक्षा जास्त उत्पादन झालं आहे. साखरेचा साठा कमी करण्यासाठी निर्यात वाढवायला हवी. जोपर्यंत साठा कमी होत नाही, तोपर्यंत बाजारभाव वाढणार नाही. त्यामुळे सरकारने साखर निर्यातीस चालना द्यावी. त्यासाठी परदेशात पाठवण्याचा खर्च कमी केला पाहिजे. वाहतूक खर्चासाठी केंद्र सरकारनं मदत करावी, असं शरद पवार म्हणाले.
मोदींसोबत बैठक
साखर उत्पादनावर मार्ग काढण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संध्याकाळी 6 वाजता बैठक होणार आहे, असंही शरद पवार यांनी सांगितलं.
पेट्रोल भाव वाढतात, पण इथेनॉलचे नाहीत
पेट्रोलचे भाव वाढतात, पण इथेनॉलचे भाव वाढत नाहीत. मात्र तेच भाव वाढायला हवेत, असं पवार म्हणाले.
राहुल गांधींशी देशहिताची चर्चा
माझी आणि राहुल गांधी यांची भेट झाली. या भेटीत राहुल गांधींसोबत देशहिताचीच चर्चा झाली, असं शरद पवार यांनी सांगितलं.
महिनाभरापूर्वी राहुल गांधींनी पवारांच्या घरी जाऊन भेट घेतली होती.
भाजपविरोधात आम्ही एकत्र
आमच्यामुळे भाजपचा फायदा होणार नाही, यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्ही एकत्रच असतो. संसदीय लोकशाहीच्याविरोधात काम करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही आहोत. दीड महिन्यात 10 निवडणुकीत 8 ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे, असं शरद पवार म्हणाले.
न्यायपालिका चौकटीबाहेर जात आहे, त्यामुळे जनतेसमोर येण्यासाठी विरोध करत आहोत, असं त्यांनी नमूद केलं.
नाणारला जाणार
मी नाणारला जाणार, पण सभा घेणार नाही, महाराष्ट्रचे हित पाहणार. त्यासाठी मी 10 मे रोजी नाणारला भेट देणार आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या
चार दिवस सासूचे, चार सूनेचे, अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा