लातूर : संस्थाचालकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये घडली. आत्महत्या करण्यापूर्वी या शिक्षकाने आपल्याला वैयक्तिक त्रास होत असल्याचं चिठ्ठीत नमूद केलं. तर शिक्षकाच्या नातेवाईकांनी संस्थाचालक शिक्षकाचा छळ करत असल्याचा आरोप केला.


उदगीर शहराजवळच्या तुकाराम नाईक प्राथमिक विद्यालयात केशव जाधव हे कार्यरत होते. संस्थाचालकाने त्यांच्याकडे असलेला मुख्याध्यापक पदाचा कार्यभार काढून घेतल्यापासून ते नाराज होते. तर स्कूल बसचं भाडं देण्यासाठी संस्थाचालकाने केशव जाधव यांचा पगारही कापून घेतला, त्यामुळे ते तणावाखाली होते, असा आरोप जाधव यांच्या पत्नीने केला.

केशव यांनी गुरुवारी सकाळी शाळेत जाऊन कार्यालयाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

नातेवाईकांनी अद्याप पोलिसात संस्थाचालकाच्या विरोधत तक्रार दिलेली नाही. अकस्मात मृत्यू अशी पोलिसात नोंद आहे. तक्रार आल्यास तपास करु, अशी माहिती पोलिस देत आहेत.

शिक्षकाच्या नातेवाईकांनी संस्थाचालकावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तर संस्थाचालकाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र शिक्षकाच्या शाळेतच झालेल्या आत्महत्येने लातूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.