एक कप चहासाठी त्यानं नोटांची बंडलं काढली... त्याच्या खिशातून निघणारी माया कुणीतरी कॅमेऱ्यात कैद केली...व्हीडिओ व्हायरल झाला... आणि या व्हीडिओवर कॉमेन्ट्सचा पाऊस पडला.. कळकट्ट मळकट्ट कपडे घालून भणंग फिरणारा हा भिकारी आहे तरी कोण? त्याच्याकडे इतके पैसे आले तरी कुठून? ते खरे तरी आहेत का?
बरं नोटा पाच दहा रुपयंच्या नाहीत... तर नोटाबंदीनंतर बदललेल्या 500 आणि 2 हजारांच्याही आहेत.. इतकंच काय दोनशे आणि पन्नासच्या न मिळणाऱ्या नोटांचंही बंडल याच्याकडे आहे.
आता या रंकाच्या वेशात कुबेर पाहून चहावालाही चहात साखरेसारखा विरघळला... त्यानं भिकारदास महाराजांना वाकून कुर्निसात केला..महाराजांनी चक्क आशीर्वादही दिला...
पण हा भिकारी आहे कुठला... हेच जाणून घेण्यासाठी आम्ही या व्हिडीओचा आणखी बारकाईने अभ्यास केला. त्यावेळी या व्हिडीओतली भाषा ही महाराष्ट्राच्या सीमाभागात बोलली जाणारी वाटत होती.
विशेषतः उस्मानाबाद आणि कर्नाटकच्या सीमेवर अशी भाषा बोलली जाते. पण याच व्हिडीओमध्ये एका गावाचं नाव समोर आलं... अलूर..
अलूरचे सर्वात मोठे सावकार... हा या बातमीतला ब्रेक थ्रू होता..
आम्ही सत्यता पडताळण्यासाठी थेट उस्मानाबादच्या लोहारा तालुक्यातल्या अलूरच्या दिशेने रवाना झालो. आणि अखेर त्या व्हिडीओमध्ये व्हायरल झालेला भिकारी आमच्या समोर होता.
गुंडाप्पा जिंदल देवकर... वय वर्षे 36...अनेक शहाण्या माणसांना जे वेड लागलंय ना तेच वेड मनोरुग्ण गुंडाप्पाला लागलंय.. पैसे गोळा करण्याचं. पैशांची बंडलं स्वतःजवळ घेऊन फिरण्याचं. आणि त्यांचं लोकांसमोर प्रदर्शन मांडण्याचं..
गुंडाप्पा देवकर गावात अनवाणी फिरतो. गावात पडलेल्या बाटल्या जमा करून विकतो. गावातील लोकांच्या पाया पडून पैसे मागतो. जमलेली चिल्लर दुकानदारांना देऊन त्यांच्याकडून नोटा घेतो. आणि त्याच नोटांची बंडले तयार करतो.
गुंडाप्पाची आई यमुनाबाई आणि भाऊ अनिल भाजीपाला विकतात. त्यांनाही गुंडाप्पा पैसे देतो. पण परत देण्याच्या अटीवर.
आई - भावालाही माहीत नाही..गुंडाप्पाकडं नेमके किती पैसे आहेत.
गावातल्या लोकांना गुंडाप्पा सुट्टे पैसे देतो.. तेही अचूकपणे...ग्रामस्थांना गुंडाप्पाच्या स्मरणशक्तीचे कौतुक आहे. त्या कौतुकापोटी ग्रामस्थांनी दोन आठवड्यापूर्वी हा व्हिडीओ काढला. जो व्हायरल झाला...
पैशाचा मोह कुणालाही सुटलेला नाही.. मग तो राजा असो वा रंक.. प्रतिष्ठित असो... वा भणंग.. या पैशाचं वेडच लै भारी.
पाहा व्हिडीओ :