Congress Working Committee List: मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची काँग्रेस (Congress) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या नव्या वर्किंग कमिटीची (Congress Working Committee) अखेर घोषणा करण्यात आली. या नव्या वर्किंग कमिटीत महाराष्ट्रातून अशोक चव्हाणांचा (Ashok Chavhan) समावेश करण्यात आला आहे. ही राज्याच्या समीकरणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची बाब आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीतील या नेमणुकांचा राज्याच्या काँग्रेस अंतर्गत राजकारणावर कसा परिणाम होऊ शकतो? हे सविस्तर जाणून घेऊयात...  


काँग्रेस वर्किंग कमिटी... काँग्रेस पक्षाच्या रचनेतली सर्वोच्च समिती. खर्गे अध्यक्ष झाल्यानंतर या नव्या वर्किंग कमिटीची काल (रविवारी) घोषणा झाली. अशोक चव्हाण यांचा या वर्किंग कमिटीत नव्यानं समावेश करण्यात आला आहे. या नियुक्त्यांचा काँग्रेसच्या राज्य पातळीवरच्या समीकरणांवरही परिणाम होणार आहे. 


काँग्रेस वर्किंग कमिटीच्या रचनेचा महाराष्ट्रासाठी अर्थ


काँग्रेस वर्किंग कमिटीत सर्वाधिक 8 सदस्य हे महाराष्ट्रातून आहेत. अशोक चव्हाण, मुकुल वासनिक, अविनाश पांडे हे 39 मुख्य सदस्यापैंकी एक आहेत, तर प्रभारी म्हणून रजनीताई पाटील, माणिकराव ठाकरे, कायम आमंत्रित म्हणून चंद्रकांत हंडोरे तर विशेष आमंत्रित म्हणून प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर यांचा समावेश आहे. अशोक चव्हाण यांचा काँग्रेस वर्किंग कमिटीत पहिल्यांदाच समावेश झाला आहे. 


काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेत अशोक चव्हाणांचंही नाव या पदासाठी होतं, पण आता ते या रेसमध्ये नसतील. सोबत चंद्रकांत हंडोरे यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार असूनही विधानपरिषद निवडणुकीत मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला, त्यांचंही पुनर्वसन वर्किंग कमिटीत झाल्याचं पाहायला मिळतंय. 


काँग्रेस वर्किंग कमिटीत सर्वाधिक 8 सदस्य हे महाराष्ट्रातून आहेत. यातले 4 चेहरे अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, चंद्रकांत हंडोरे हे सीडब्ल्यूसीत प्रथमच असणार आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी विजय वड्डेटीवार यांच्या नावाला अशोक चव्हाणांचं समर्थन होतं. खर्गेंच्या अध्यक्षतेत चव्हाणांचं वजन वाढत असल्याची चर्चा असतानाच अशोक चव्हाण आता सीडब्लूसीतही दिसणार आहेत. राष्ट्रीय पातळीवर त्यांना काय जबाबदारी दिली जाते, हे पाहणं महत्वाचं असेल. 


मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सीडब्लुसीची नवी फेररचना अपेक्षित होती. फेब्रुवारीत रायपूरमध्ये झालेल्या महाशिबिरातच त्याची घोषणा झाली होती. पण जवळपास 6 महिन्यानंतर त्याची अखेर घोषणा झाली आहे. 


खर्गेंच्या अध्यक्षतेत काँग्रेस किती कात टाकणार?



  • सीडब्ल्युसीत राहुल, प्रियंका आणि सोनिया गांधी या गांधी कुटुंबातल्या तिघांचाही समावेश आहे. 

  • राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या कार्यपद्धतीवर नाराज सचिन पायलट यांना सी डब्ल्यू सीत स्थान मिळालं आहे. 

  • खर्गेंच्या विरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे शशी थरुर यांच्यासह मनीष तिवारी, आनंद शर्मा, वीरप्पा मोईली या जी 23 गटातल्या नेत्यांनाही यात स्थान आहे. 

  • अर्थात सीडब्ल्युसीत निवडणुका होऊन नेमणुका व्हाव्यात ही जी 23 गटाची आधी मागणी होती. पण नंतर त्यावर काही तडजोड होऊन ती मागे पडली होती. 


महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आता प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, महिला काँग्रेस अध्यक्ष, युवक काँग्रेस अध्यक्ष अशी सगळी पदं विदर्भात आहेत. अशोक चव्हाणांना आता सीडब्ल्युसीत स्थान मिळालं आहे. बाळासाहेब थोरात यांच्याकडे गटनेतेपद आहे. आता निवडणुकांआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा विचार करताना रिजनल बॅलन्सचा विचार करतं की विदर्भावरच लक्ष केंद्रित करतं याची उत्सुकता असेल. 


दरम्यान, लोकसभा निवडणुकीला आता अगदी सहा महिन्यांचा कालावधीच उरला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं दीर्घकाळ रखडलेल्या वर्किंग कमिटीची घोषणा तर केलीय. पण प्रत्यक्ष कार्यशैलीतल्या बदलात किती परिणाम काँग्रेस दाखवते त्यावरच पुढचं यश अवलंबून असेल असं दिसतंय. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या नावांची अखेर घोषणा; महाराष्ट्रातून अशोक चव्हाणांसह 'या' नेत्यांची वर्णी