मुंबई: दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या राज्यात काँग्रेसतर्फे आंदोलन केलं जाणार आहे. काँग्रेस पक्ष दिल्लीत होत असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात उद्या आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांना समर्थन तसंच केंद्र सरकारने केलेला कृषी कायदा विरोधक यासाठी आंदोलन केले जाणार आहेत. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस जिल्हा अध्यक्षांना यासंदर्भात आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ब्लॉक मुख्यालय येथे हे आंदोलन होणार आहे. कोविडच्या नियमांचे पालन करुन आंदोलन करावे, असं सांगण्यात आलं आहे.



देशात पुन्हा एकदा सुरु होतेय अवॉर्ड वापसी
देशात पुन्हा एकदा अवॉर्ड वापसी सुरु होतेय. अन्नदाता शेतकरी आंदोलनासाठी ठाण मांडून असताना त्याच्या पाठिंब्यासाठी पंजाबमधले खेळाडू पुढे आलेत. शेतकऱ्यांचं दिल्ली कूच रोखण्यासाठी सरकारनं ज्या पद्धतीनं बळाचा वापर केला त्याचा निषेध म्हणून हे खेळाडू पुरस्कार परत करणार आहेत. पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त विजेता पहलवान करतार सिंह, अर्जुन पुरस्कार प्राप्त सज्जन सिंह चीमा, अर्जुन पुरस्कार प्राप्त हॉकीपटू राजबीर कौर यांनी हा निर्णय घेतला आहे. जालंधरमध्ये एका पत्रकार परिषदेत या सर्व खेळाडूंनी आपला निर्णय जाहीर केला. 5 डिसेंबर रोजी राष्ट्रपती भवनाच्या दारात आपले पुरस्कार ठेवून हे खेळाडू आपल्या सरकारी सन्मानाचा त्याग करणार आहेत. दिल्लीच्या सीमांवर बसलेल्या शेतकऱ्यांना समर्थन द्यायलाही उतरणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


सातव्या दिवशीही शेतकरी संघटनांचा दिल्लीच्या सीमेवर ठिय्या


राजधानी दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. आज सातव्या दिवशीही अनेक शेतकरी संघटनांनी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडला आहे. आता शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला हरियाणातल्या खाप पंचायतींचेही समर्थन मिळालंय. आज हरियाणातल्या खाप पंचायती मोठ्या संख्येने दिल्लीकडे कूच करणार आहेत. खाप पंचायतींच्या दिल्लीकडे जाण्याच्या निर्णयामुळे त्यांना दिल्लीत जाण्यापासून रोखण्यासाठी हरियाणाच्या प्रशासनाने जागोजागी नाकाबंदी केली आहे. तर या प्रश्नावरुन खट्टर सरकार पाडण्याची धमकी खाप पंचायतींनी दिली आहे.


खाप पंचायतींच्या दिल्लीकडे जाण्याच्या घोषणेमुळे हरियाणात भूकंप झाला आहे. या खाप पंचायतींच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी खाण्या-पिण्याचे साहित्य नेण्यात येणार आहे. त्याचबरोबर आपापल्या भागातल्या आमदारांवर खट्टर सरकारचा पाठिंबा काढून घेण्यासाठी दबाब तयार करण्याचाही निर्णय खाप पंचायतींनी घेतला आहे.


मेवातच्या शेतकऱ्यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून तेही दिल्लीकडे जाणार आहेत. या जिल्ह्यातील जवळपास 30 शेतकऱ्यांना पोलीसांनी काल ताब्यात घेतलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीसांनी दिल्ली-नोएडाकडे जाणारा चिल्ला महामार्ग बंद केला आहे.


कालच्या बैठकीत कोणताही निर्णय नाही
काल केंद्र सरकारच्या वतीनं कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. पण या बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नाही. केंद्र सरकारने या विषयावर एक कमिटी स्थापन करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. परंतु अशी कमिटी स्थापन झाली तरी तिचा निष्कर्ष येईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचं शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारला सांगण्यात आलंय. सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी रोज बैठक घेण्याचाही प्रस्ताव ठेवला आहे.