Nana Patole : महाराष्ट्राचे सरकारचं महाराष्ट्राच्या शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराला संपवायला लागलेलं आहे. अशा प्रकारची जी विषारी व्यवस्था दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येते आणि महाराष्ट्रात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी जी व्यवस्था निर्माण केली जाते. अशा लोकांना तर परवानगीचं दिली नाही पाहिजे. पण, अशा पद्धतीने प्रक्षोभकपणे बोलणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे, त्यासाठी कायदे आहेत. राज्य सरकारनं केलेले आहेत. मात्र सरकारमध्ये अशा पद्धतीची नपुसकता नसावी. महाराष्ट्रामध्ये शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराला धक्का पोहचविण्याचं काम महाराष्ट्रातील भाजपचं सरकार करत असेल तर काँग्रेस सहन करणार नाही. असा थेट इशारा देत टी राजाच्या वक्तव्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 


 सरकारने तातडीनं कारवाई करावी - नाना पटोले


तेलंगणातील भाजप आमदार आणि हिंदू धर्माचे प्रचारक आमदार टी. राजा यांचा भिवंडीतील दौरा अगोदरच वादग्रस्त ठरला होता. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी टी. राजा यांच्या भाषणाला परवानगी न देण्याची मागणी केली होती. मात्र, तरीही भिवंडीत त्यांचा नियोजित कार्यक्रम पार पडला. यावेळी, केलेल्या भाषणातून त्यांनी पु्न्हा एकदा 400 पारच्या नाऱ्यावर भाष्य केलं. भाजपने 400 पारचा नारा दिला, त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला, असा दावा महायुतील सहकारी पक्षांच्या काही नेत्यांनी केला आहे. त्यात, आता टी राजा यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यात आता नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेत धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्यासाठी असे प्रक्षोभक भाषण केलं असतील तर तातडीनं सरकारनं कारवाई करावी. अशी मागणी केली आहे. तसेच  दुसऱ्यांदा अशा घटना होऊ नये, याची काळजी सरकारनं घ्यावी. असेही नाना पटोले यावेळी म्हणाले आहेत.  



सुप्रीम कोर्टाचे सुद्धा यामध्ये निर्देश दिले गेलेले आहेत. पण, सरकार सुप्रीम कोर्टाचे सुद्धा निर्माण मान्य करीत नसेल आणि या पद्धतीचं महाराष्ट्रात कृती केल्या जात असेल तर काँग्रेस सहन करणार नाही, अशी कणखर भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलीय. भाजप आमदार टी आर सिंग यांनी 100 किल्ल्यांवर मशीद आणि दर्गा आहे, शिंदेंनी तिथं सफाई करावी, वक्फ बोर्ड बरखास्त करावं आणि 400 पार झाल्या असता तर भारत हिंदू राष्ट्र झालं असतं, असं वादग्रस्त विधान केलं होतं. यावर नाना पटोले यांनी सडकून टीका केलीय.


नाना पटोलेंनी केलं एलॉन मस्क यांच्या विधानाला समर्थन


जनतेमध्ये ईव्हीएम मशीनवरील विश्वास आता राहिलेला नाही. जनतेचा विश्वास आपल्या मतांनी सरकार बनवण्यावर असला पाहिजे. मतदानाचा टक्का हा कमी होत चाललेला आहे आणि म्हणून केंद्र सरकारनं आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं देशात बायलेटवर मतदान घ्यावं, ही जनतेची मागणी मान्य करावी, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. जागतिक पातळीवर ईव्हीएम संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे. अनेक देशांनी ईव्हीएम बंद केलेलं आहे आणि बॅलेट पेपरवर आलेले आहेत. निवडणूक झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा आतातरी विरोधकांवर, ईव्हीएमवर विश्वास आहे की नाही, विरोधकांच्या विश्वास असो की नसो आमची भूमिका त्याच्यातली स्पष्ट आहे की, जनतेला ईव्हीएम बद्दलचा अविश्वास आहे. लोकशाहीमध्ये व्यक्तिगत स्वातंत्र माझं मतदान हे गुप्त आहे, माझ्या मतानी मी सरकार करणार आहे. माझ्या मतांनी लोकप्रतिनिधी निवडणार आहे आणि मला विश्वास नाही की, माझं मतं मी जिथं मारलो तिथं जाते आहे. हा अविश्वास निर्माण होणं म्हणजेच व्यक्ती स्वातंत्र्याला घाला आहे. म्हणून अशा पद्धतीची नरेंद्र मोदींनी टिंगल करण्यापेक्षा विरोधकांचं, जनतेचं ऐकलं पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले. 


देशात लोकांच्या मनातील ऐका आणि जागतिक पातळीवर ईव्हीएम मशीनवर आणि देशातील जनतेला ईव्हीएम मशीनवर शंका आहे तर, बायलेट वर मतदान व्हावं, ही मागणी जनतेची आहे. पण, सरकार का यावर दुर्लक्ष करत आहे? पाच वर्षाच्या निवडणुका असतात, पाच दिवसाच्या निवडणूक नसतात. अनेकदा यामध्ये सांगण्यात आलं की वेळ जात आहे. पण वेळ गेला तर काय होतं? महिनाभर निवडणूक होतात, आचारसंहिता लावून ठेवल्यात, मग हा वेळ गेला नाही का? पाच दिवस जर मतमोजणीला लागत असेल तर काही बिघडत नाही. म्हणून केंद्र सरकारनं आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं देशात बायलेट वर मतदान घ्यावं, ही जनतेची मागणी मान्य करावी, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. एलॉन मस्क यांनी ईव्हीएम मशीन बद्दल केलेल्या ट्विटबद्दल नाना पटोले यांनी हे विधान केलंय.


इतर महत्वाच्या बातम्या