kirit Somaiya :  भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला इशारा दिलाय. दिवाळीनंतर फटाके फोडणार असं ट्विट करत सोमय्यांनी महाविकास आघाडीला सूचक इशारा दिलाय. दिवाळीनंतर तीन मंत्र्यांचे तीन घोटाळे आणि जावयाचे तीन अशा एकूण सहा घोटाळ्यांचा पर्दाफाश करणार, असा इशारा सोमय्या यांनी दिलाय. सोमय्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि काँग्रेसच्या मंत्र्यांविरोधात आघाडी उघडलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार भावना गवळी, आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह अन्य काही नेत्यांवर सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात तपास यंत्रणांकडे कागदपत्रेही सादर केली आहेत. आता नवाब मलिक कोणता खुलासा करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सोमय्यांच्या या ट्विटला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 


दिवाळीनंतर फटाके फोडणार असल्याचा इशारा देणाऱ्या किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दिवाळीनंतर आपणच मोठा भांडाफोड करणार असा दावा नवाब मलिक यांनी केलाय. तसंच मोठा पर्दाफाश केल्यानंतर भाजपवाले तोंड दाखवू शकणार नाहीत असंही मलिक यांनी म्हटलंय. ते सकाळी पत्रकार परिषदेत बोलत होते. 






भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रविवारी ट्वीट करत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना एकप्रकारे इशारा दिला आहे. दिवाळीनंतर आपण सहा घोटाळे बाहेर काढणार असल्याचं ट्वीट त्यांनी केलं आहे. सोमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये मंत्र्यांची नावं जाहीर केली नसल्याने हे मंत्री नेमके कोण, याची चर्चा रंगली आहे. पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे टेन्शन वाढवल्याचं चित्र निर्माण झालं आहे.