मुंबई : मुंबई महापालिकेत बहुमत सिद्ध करण्यासाठी शिवसेनेला मदत करण्यास काँग्रेस तयार झाली आहे. काँग्रेस नेते अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यास सहमती दर्शवली आहे.

एकीकडे मुंबई महापालिकेत कुणालाच स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळं काँग्रेसनं शिवसेनेसमोर मदतीचा हात पुढे करण्याची तयारी दर्शवली आहे. शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास विचार करु, असं काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

अब्दुल सत्तार काय म्हणाले?

औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेकडून प्रस्ताव आला तर काँग्रेस विचार करेल आणि मुंबईमध्येही तसा विचार करायला हरकत नाही. कारण भाजप हाच मुख्य शत्रू आहे, असे अब्दुल सत्तार म्हणाले.

एबीपी माझाच्या चर्चेतही काँग्रेस नेते अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेला समर्थनाची तयारी दर्शवली. ते म्हणाले, "वरिष्ठ नेत्यांना आम्ही प्रपोजल देऊ. आपली लढाई भारतीय जनता पक्षाशी आहे. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल, तर या प्रस्तावावर चर्चा करण्यासारखी महाराष्ट्रात परिस्थिती निर्माण झालेली आहे.  या परिस्थितीमध्ये चर्चा करायला पाहिजे."

मुंबई महापालिकेतील पक्षनिहाय जागा :

  • भाजप – 82

  • शिवसेना – 84

  • काँग्रेस – 31

  • राष्ट्रवादी – 9

  • मनसे – 7

  • इतर – 14


काँग्रेसने पाठिंबा दिल्यास बलाबल कसे असेल?

शिवसेनेच्या मुंबई महापालिकेत 84 जागा आहेत. शिवाय, बंडखोर स्नेहल मोरे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या एकूण जागा 85 होती. त्यात मालाडमधील अपक्ष नगरसेवक तुळशीराम शिंदे शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार आहेत.  म्हणजे शिवसेनेचे 85 आणि अपक्ष 1 अशा एकूण 86 जागा होतील. स्थितीत काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिल्यास 86 आणि काँग्रेसच्या 31 जागा मिळून एकूण 117 जागा होतील. म्हणजेच बहुमताचा आकडा सहज पार करणं शिवसेनेला शक्य होईल.

दरम्यान, भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेला मदत करावी, अशी परिस्थिती असली तरी त्याचे देशभर अन्यत्र पडसाद उमटतील आणि अल्पसंख्यांकांच्या मतांवर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे आता काँग्रेस मुंबई महापालिकेत शिवसेनेला मत देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.