Lok Sabha Electio 2024 : राज ठाकरे (Raj Thackeray) हे वाघ माणूस आहेत. मात्र त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. राज ठाकरे हे दिल्लीच्या सत्तेपुढे कधीही झुकणार नाही, असे ते वारंवार सांगत होते. मात्र, दिल्लीची वारी त्यांना करावी लागली. यात कुठेतरी त्यांना अडचणीत आणण्याचे, त्यांना पिंजऱ्यात अडकवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होतंय का, अशी शंका सध्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनात असल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागले आहेत.


आज होणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या(MNS) गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांची भूमिका ही सत्ताधारा विरोधात नसेलच असा कयास सध्या बांधण्यात येतोय. मात्र, राज ठाकरे दिल्लीच्या तक्तापुढे झुकणार नाही, ही प्रत्येक मराठी माणसाची अपेक्षा आहे. म्हणूनच आज राज ठाकरे जे काही बोलतील ते सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध असेल आणि दिल्लीश्वरापुढे झुकणारे नसेल, असा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी बोलताना व्यक्त केलाय.


महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम


महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विचार आणि भाषा किती असांस्कृतिक आहे, हे काल महाराष्ट्रातील जनतेने बघितले आहे. काल चंद्रपुर येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडलेल्या प्रचारसभेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम त्याठिकाणी केल्या गेलंय. अशा विचारांना महाराष्ट्रातील जनता योग्य तो धडा शिकवेल, अशी टीकाही विजय वडट्टीवार यांनी सुधीर मुनगंटीवारांवर केलीय. अर्धवट माहितीचा आधार घेऊन अशा पद्धतीने किळसवाणे वक्तव्य करणं हे कुठल्याही महाराष्ट्रातील माणसाला न पटणारे आहे. तसेच जनता देखील अशा खालच्या स्तरावरील विचारांना कधीही खपवून घेणार नाही. अशा प्रवृत्तीला आगामी काळात  जनता योग्य तो धडा शिकवेल, असा विश्वासही विजय वडट्टीवार यांनी बोलताना व्यक्त केलाय.


प्रतिभा धानोरकर काय म्हणाल्या? 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास 33 मिनिटं भाषण केले. मात्र, त्यात सगळे विषय हे केंद्राचे होते. त्यांच्या भाषणात चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी काय देणार किंवा चंद्रपूरसाठी तुम्ही काय आणणार, यावर ते काहीही बोलले नाही. भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आणीबाणी वर बोलताना अगदी खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ वक्तव्य केले आहे. त्यांच्या सारखा मुरब्बी आणि मातब्बर राजकारणी अशा पद्धतीने वक्तव्य करेल याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती.


देशी आणि देश याच्या बाबतीत मुनगंटीवार जे बोलले त्यावर आम्ही जास्त बोलणार नाही. गेल्या निवडणुकीत पण हा विषय आला होता. पण विजय कोणाचा झाला आणि पराजय कोणाचा झाला, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे त्यावर काहीही न बोलता आगामी निवडणुकीत कौल कोणाच्या बाजूने असेल हे स्पष्ट होईल, असा विश्वासही काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी बोलताना व्यक्त केलाय.


इतर महत्वाच्या बातम्या