विधीमंडळात नाणार प्रकल्पावरुन शिवसेनेसह विरोधक आक्रमक
एबीपी माझा वेब टीम | 12 Jul 2018 12:50 PM (IST)
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह शिवसेनेच्या आमदारांनीही नाणार प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी केली.
नागपूर: नाणार प्रकल्पावरुन विरोधक आजही विधीमंडळात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह शिवसेनेच्या आमदारांनीही नाणार प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी केली. विरोधकांनी नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणा दिल्या. यावेळी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात गुपचिळी बाळगणाऱ्या नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतली असता, आंदोलकांनी त्यांना हाकलून दिलं आणि निवडणूक जवळ आली म्हणून आपण आलात का? असा सवाल विचारल्याचं म्हटलं. त्यावर शिवसेनेच्या आमदारांनी हरकत घेत विखे पाटलांनी माफी मागण्याचा आग्रह धरला. भास्कर जाधव, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस “नाणार प्रकल्पासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला आहे. काही जण त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी प्रकल्पाला विरोध करत आहे, काहींना निवडणूक जिंकायची आहे, काहींना आपल्या पक्षाचा राजकीय आधार वाढवायचा आहे. मात्र कोणीही या प्रकल्पाचा भविष्यातला धोका लक्षात घेत नाही आहे. प्रस्तावित नाणार प्रकल्प आणि जवळच होत असलेले अणू ऊर्जा प्रकल्प यादरम्यान फक्त 1.2 किमीचे हवाई अंतर आहे. जर भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर फक्त रत्नागिरीच नव्हे तर सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर हे 4 जिल्हे धोक्यात येतील”, असं भास्कर जाधव म्हणाले. नाणार प्रकल्पाचं आम्हाला राजकारण करायचं नाही. अनिल काकोडकर यांनी अणू ऊर्जा प्रकल्प आणि ग्रीन ऑईल रिफायनरी जगाच्या पाठीवर एकाच ठिकाणी कुठेच नाही असं म्हटलं होतं. या दोन प्रकल्पात फक्त 13 ते 14 किलोमीटर अंतर आहे. याचा धोका फक्त 17 गावांना नाही तर अनेक जिल्ह्यांना आहे. कोकण उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. आम्ही जर जगलो तर रोजगाराचा उपयोग आहे. सरकारने हट्टीपणा करू नये. शिवसेनेनं फक्त राजकीय हेतूने नाही तर वैधानिक पद्धतीने, अभ्यासपूर्वक, नियमांची उजळणी करून आरोप करावे, असा चिमटा भास्कर जाधवांनी काढला. राधाकृष्ण विखे पाटील नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. मारुती मांजरेकर, जिल्हा राजापूर मधले व्यक्ती पोलीस रेकॉर्डवर अनेक वर्षांपासून गायब आहेत. मात्र त्यांच्या नावाने भूसंपादनाला अनुमती दिल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. अश्विनी आघाशे यांनी जमिनीचे खोटे दस्तऐवज बनवल्याची तक्रार राजापूर पोलीस स्थानकात केली आहे. या सभागृहात काही लोकांचा नाणारला बेगडा विरोध आहे. सर्व विषय बाजूला ठेऊन नाणारवर चर्चा व्हावी. शिवसेना आमदार सुनील प्रभू नाणारवासीयांच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे. सभागृहात असो किंवा सभागृहा बाहेर, शिवसेना नाणारच्या विरोधातच आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान मुंबईत असताना उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारली. संबंधित बातम्या ग्राऊंड झीरो रिपोर्ट : नाणार प्रकल्प काय आहे?