'महावितरण'च्या वीजदरात प्रतियुनिट 8 पैसे दरवाढीचा प्रस्ताव
एबीपी माझा वेब टीम | 11 Jul 2018 09:04 PM (IST)
'महावितरण'ने सुमारे 34 हजार 646 कोटी रुपयांच्या बहुवार्षिक महसुली तुटीच्या वसुलीसाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे मध्यावधी फेरआढावा याचिका दाखल केली आहे.
मुंबई : 'महावितरण'च्या वीजदरात प्रति युनिटमागे केवळ 8 पैशांची वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. वीजदरवाढीचा मोठा शॉक बसण्याची शक्यता तूर्तास टळली आहे. 'महावितरण'ने सुमारे 34 हजार 646 कोटी रुपयांच्या बहुवार्षिक महसुली तुटीच्या वसुलीसाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे मध्यावधी फेरआढावा याचिका दाखल केली आहे. या प्रस्तावात राज्यातील सुमारे 1.20 कोटी ग्राहकांच्या वीजदरात केवळ 8 पैसे एवढी अत्यल्प दरवाढ प्रस्तावित करण्यात आलेली आहे. या याचिकेत राज्यात येणाऱ्या नवीन उद्योजकांना प्रतियुनिट एक रुपया सवलत, ऑनलाईन वीजबील भरणाऱ्या वीजबिलांवर 0.5 टक्के सूट प्रस्तावित आहे. याशिवाय 2019-20 वर्षासाठी कोणतीही दरवाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही. महावितरण कंपनीची आर्थिक व्यवहार्यता टिकवून ठेवणे, महागाई निर्देशांकाच्या अनुषंगाने विविध खर्चाचा आढावा, महावितरणच्या वीजयंत्रणेच्या संचालन, दुरुस्तीवरील वाढता खर्च आणि ग्राहकसेवेसाठी पायाभूत आराखड्या अंतर्गत करण्यात येत असलेली मोठी कामं, महावितरणच्या नियंत्रणाबाहेर असलेले विविध घटकांमुळे निर्माण होणारे वाढीव खर्च यासारख्या कारणांसाठी प्रस्तावित दरवाढ आवश्यक आहे. ग्राहक वर्गवारीनिहाय वीजवापरातील बदल आणि 2015-16 आणि 2016-17 दरम्यान मुक्त प्रवेश वापरात झालेली वाढ यामुळे महावितरणच्या महसूलावर विपरित परिणाम झाला असून महसुली तूट निर्माण झाली आहे.