इंदापूर : इंदापूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे एकाच कार्यक्रमात एकत्र दिसून आले. या दोघांनी शहरातील अलंकार परिवाराच्या एस. एस. मोबाईल शॉपचं उद्घाटन फित कापत केलं. पण या उद्घाटनानंतर आगामी विधानसभेत नेमकं कोणाच्या जागेला कात्री लागणार यावरुन चर्चा रंगत आहेत.


हर्षवर्धन पाटील यांनी अनेक वर्ष मंत्री म्हणून राज्यात काम केलं आहे. त्यामुळे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग राज्यभर आहे. तर हर्षवर्धन पाटील यांना मागील विधानसभेत पराभूत करुन जायंट किलर ठरलेले धनगर समाजाचे नेते म्हणून दत्तात्रय भरणे यांची ओळख आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यातून चांगले मताधिक्य मिळवून देण्यात आघाडी यशस्वी ठरली असली तरी हे मताधिक्य राष्ट्रवादी काँग्रेसचे का काँग्रेसचे यावरुन तालुक्यात कायमच खलबतं सुरु असतात. अशातच आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने पाटील आणि भरणे एकत्र येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

VIDEO | इंदापूरचे हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर? नेमकं तथ्य काय? | एबीपी माझा



मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढले व इंदापूर विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा भरणे यांनी फडकवला. यासाठी त्यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे सहकार्य मिळाले. अजित पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून हर्षवर्धन पाटील यांना ओळखले जाते. या दोघांचे राजकारणातील विळा- भोपळ्याचे वैर आख्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे आघाडीच्या जागावाटपात इंदापूरची जागा कोणाला जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. इंदापूरची जागा अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली आहे . तर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी जवळीक साधत या जागेवर काँग्रेसच्या वतीने दावा केला आहे.

मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खुद्द अजित पवार यांनी आघाडीत बिघाडी झाली तरी चालेल पण ही इंदापूरची विधानसभेची जागा राष्ट्रवादीच लढविणार असे जाहिर वक्तव्य इंदापूरमध्ये केलं होतं. पण अजित पवारांचे हे वक्त्यव्य लोकसभा निवडणुकीच्या अगोदरचे होते. यंदाच्या लोकसभेत आघाडी झाली.  अजित पवार, हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे यांनी एकत्र व्यासपीठांवर येऊन सुप्रिया सुळेंचा एकत्रित प्रचार केला. सुळे यानी इंदापूर तालुक्यात अधिकचे मताधिक्य मिळविले.

सध्या भरणे आणि पाटील हे तालुक्याच्या विविध कार्यक्रमात एकत्र येताना पाहायला मिळत असले तरी या दोघांचे कार्यकर्ते मात्र आम्हीच इंदापूरची जागा लढविणार यावर ठाम आहेत. त्यामुळे राज्यात जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडी झाली तरी इंदापूरच्या जागेत बिघाडी होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

एकंदरीतच लोकसभेला हर्षवर्धन पाटील यानी केलेल्या मदतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा काँग्रेसला देत हर्षवर्धन पाटील यांना हात देणार का? की या जागेवर आपला दावा सांगून पुन्हा हर्षवर्धन पाटील यांना अडचणीत आणणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.