अमरावती : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं राज्यपालांकडे 12 नावे मंजूरीसाठी पाठविली आहेत. यात काँग्रेसच्या कोट्यातून कलाकार आणि गायक अनिरूध्द वनकर आणि राष्ट्रवादीकडून प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांची नावे सुचविण्यात आली आहेत. हे दोन्ही नेते वंचित बहूजन आघाडीकडून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढले आहेत. प्रा. डॉ. यशपाल भिंगे वंचितकडून नांदेडमधून लोकसभा लढले होते. त्यांनी सव्वा लाखांच्या जवळपास मतं घेतल्यानेच नांदेडमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा पराभव झाला होता. तर गायक आणि कलाकार अनिरूध्द वनकर यांनी चंद्रपूर या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदार संघासाठी विधानसभा लढवली होती. या दोन्ही नेत्यांना थेट काँग्रेस-राष्ट्रवादीनं आपल्या गळाला लावल्यानं प्रकाश आंबेडकर काय बोलतात?, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.



आज अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी यावर आपलं मौन सोडलं आहे. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे उमेदवार नसल्यानं त्यांनी डॉ. यशपाल भिंगे आणि अनिरूध्द वनकर या आमच्या दोन्ही उमेदवारांना  पळविल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. या दोन्ही कार्यकर्त्यांच्या जाण्याचं दु:ख असल्याचं आंबेडकर म्हणालेत. मात्र, या दोघांचंही राजकारण औटघटकेचं असल्याचं आंबेडकर म्हणालेत. त्यांच्या जाण्यानं ना पक्षाला खिंडार पडलं, ना पक्षाचं नुकसान झालं हे आंबेडकरांनी स्पष्ट केलं. आपल्याला अनेकजण सोडून गेलेत. मात्र, दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्या नेत्यांची उपयुक्तता संपल्यांचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं.




दरम्यान, मंदिरं न उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर आज प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारला शिर्डी, सिद्धीविनायकाचा पैसा चालतो. मग मंदिरं का चालत नाहीत? असा सवाल आंबेडकरांनी सरकारला केला आहे.




मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांना वारकऱ्यांपासून काही समस्या आहे का? की वंचित वारकऱ्यांच्या सोबत आली म्हणून मंदिर उघडण्यास वेळ लागत आहे असा सवाल आंबेडकरांनी सरकारला केला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात यांचा उल्लेख उपहासानं आंबेडकरांनी 'आचार्य' असा करीत त्यांना टोला लगावला आहे. सरकार आता आळंदीच्या 'आचार्यां'चं ऐकणार का?, असं विचारत त्यांनी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनाही टोला लगावला आहे.