मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे राज्यातील दुसरे खासदारही लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती आहे. हिंगोलीचे खासदार राजीव सातव लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हिंगोली मतदारसंघातील पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीव सातव स्वतःहून माघार घेत असल्याची चर्चा आहे.
राजीव सातव यांच्यावर पक्षाने गुजरात राज्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे सातव यांचा हिरमोड झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र हिंगोली मतदारसंघातील पक्षांतर्गत राजकारणामुळे राजीव सातव स्वतःहून माघार घेत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
खासदार असूनही मतदारसंघातील नांदेड जिल्ह्यात काम करण्याची योग्य संधी मिळाली नाही, अडवणूक झाली त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातून सातव यांनी माघार घेतल्याचं म्हटलं जातं.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमरखेड, कळमनुरी, किनवट, बसमत, हदगाव, हिंगोली हे विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातील हदगाव आणि किनवट नांदेड जिल्ह्यात येतात. या दोन मतदारसंघात राजीव सातव यांना पक्षातून काम करण्यास अडवणूक होत असल्याची चर्चा आहे.
अशोक चव्हाण राज्यात येणार?
राज्यात 2019 मध्ये सत्तांतर झालं आणि काँग्रेस पुन्हा सत्तेत आलं, तर अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार असू शकतात. त्यामुळे अशोक चव्हाण लोकसभेऐवजी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीला काँग्रेसचा चेहरा अशोक चव्हाण असू शकतात, हे हळूहळू स्पष्ट होत आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसच्या राज्यात फक्त दोन जागा निवडून आल्या होत्या. ज्यामध्ये अशोक चव्हाण यांचाही समावेश होता.