Congress MP Balu Dhanorkar Exclusive : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी त्यांच्याच पक्षाचे राज्यातील मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा बँकेत विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांचं वर्चस्व असताना झालेल्या कारभाराविरोधात लोकसभेत आवाज उठवल्यानंतर आज धानोरकर यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. बाळू धानोरकर यांच्या पत्नीही काँग्रेसच्या आमदार आहेत. आता काँग्रेस आमदारांच्या सोनिया भेटीसाठीही ते प्रयत्न करत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर खासदार बाळू धानोरकर यांच्याशी एबीपी माझानं संवाद साधला. यावेळी त्यांनी काही गंभीर आरोप केले. खासदार बाळू धानोरकर यांनी काल राष्ट्रपतींची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून ते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात आक्रमक आहेत. संसदेत सुद्धा त्यांनी चंद्रपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्याचा विषय उपस्थित केला होता .
मी खासदार, माझी बायको आमदार आम्हाला सुद्धा कर्ज मिळत नाही
खासदार धानोरकर म्हणाले की, ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत असा माणूस चंद्रपूर जिल्हा बँकेवर नेमला आहे. मी खासदार, माझी बायको आमदार आम्हाला सुद्धा कर्ज मिळत नाही.. आम्हाला कर्ज मिळत नाही तर सर्वसामान्यांना न्याय मिळेल का, असं ते म्हणाले.
अनेक ठिकाणी निधीचं समान वाटप होत नाही अशी आमदारांची तक्रार
त्यांनी पुढं म्हटलं की, विजय वडेट्टीवार आणि माझा वाद हा विषय नाही. बँकेचा सीओ हा वाद आहे. त्यांचा मतदारसंघ आणि माझा याच्यात काही विषय नाही. ते आक्रमक आहेत तसा मीही आक्रमक आहे. सोनिया गांधींच्या भेटीची वेळ आमदारांनी मागितली आहे. अनेक ठिकाणी निधीचं समान वाटप होत नाही अशी आमदारांची तक्रार आहे, असं ते म्हणाले.
जिथे पालकमंत्री न्याय देत नाहीत अशा ठिकाणी पालकमंत्री बदल लावायचा आहे की नाही याबद्दल विचार हवा. विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचा अधिकार आहे आणि तो मिळालाच पाहिजे, असंही ते म्हणाले.
अडीच वर्ष झाली तेच तेच पालकमंत्री, भाकरी बदलली पाहिजे
त्यांनी म्हटलं की, ज्या मंत्र्यांबद्दल आमदारांना आकस असेल ते सोनिया गांधी यांच्यासमोर सांगतील. आमदाराला सोबत घेऊन जर जात नसतील मंत्री तर बदलले पाहिजेत. अडीच वर्ष झाली तेच तेच पालकमंत्री, भाकरी बदलली पाहिजे, असंही ते म्हणाले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha