कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, बांधकाम सभापती संजय कामतेकर, पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री, नरसेवक अभि मुसळे, मेघा गांगण, स्वाभिमान शहराध्यक्ष राकेश राणे, संदीप नलावडे, निखिल आचरेकर, राजन परब, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, माजी उपसरपंच लक्ष्मण घाडीगांवकर, माजी पं. स. उपसभापती बबन हळदिवे, विठ्ठल देसाई, किशोर राणे, शिवसुंदर देसाई, सचिन पारधीये यांना अटक करण्यात आली आहे.
नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी केलेल्या चिखलफेकीचा त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. नारायण राणेंनी लेकाच्या कृत्याबाबत माफीही मागितली होती.
'नितेश राणे यांचं वर्तन चुकीचं होतं. मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या चिखल आणि खड्ड्याविरोधातील राग आणि आंदोलन समजू शकतो, मात्र नितेश यांच्या समर्थकांनी केलेली हिंसा चुकीची आहे. मी याला अजिबात पाठिंबा देत नाही', अशा शब्दात राणेंनी निषेध नोंदवला होता.
मी त्याला माफी मागायला का सांगणार नाही? तो माझा मुलगा आहे. जर एखादा बाप स्वतःची चूक नसताना माफी मागू शकतो, तर मुलाला तर माफी मागावीच लागेल, असंही राणेंनी सांगितलं होतं.
काय घडलं होतं?
नितेश राणे, स्वाभिमान पक्षाचे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पुलावर बांधलं. सर्वसामान्य जनता रोज जो चिखल मारा सहन करते, तो तुम्ही पण आज अनुभवा, असं म्हणत त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या.
संपूर्ण कणकवली तुंबवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा सवाल विचारत नितेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांना गडनदी पूल ते जाणवली पूलपर्यंत पायी चालत नेऊन चिखल आणि खड्ड्यांची वस्तुस्थिती दाखवली. शिवाय कार्यकर्त्यांनी शेडेकर यांना धक्काबुक्कीही केली.