मुख्यमंत्री बदलावर नितीन गडकरी म्हणतात...
एबीपी माझा वेब टीम | 27 Jul 2018 11:23 PM (IST)
आंदोलन करण्याचा अधिकार जनतेला आहे. पण फडणवीस ही आंदोलनं अगदी संयमीपणे हाताळत आहेत, असेही गडकरी म्हणाले.
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चांचं भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खंडन केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजिबात बदलले जाणार नाहीत, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले? “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजिबात बदलणार नाहीत. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत प्रगल्भतेने काम करत आहेत. शिवाय भाजप त्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे.”, असे नितीन गडकरी म्हणाले. आंदोलन करण्याचा अधिकार जनतेला आहे. पण फडणवीस ही आंदोलनं अगदी संयमीपणे हाताळत आहेत, असेही गडकरी म्हणाले. दरम्यान, भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु झाली आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र तातडीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राऊतांच्या दाव्याचं खडन केलं होतं. राज्यात मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाने आक्रमक रुप धारण केलं होतं. हे आंदोलन हाताळण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमी पडले का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यानंतर संजय राऊत यांच्या दाव्याने या प्रश्नाला आणखीच बळ मिळालं आणि त्याचे चर्चेत रुपांतर झाले. मात्र आधी चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार आणि आता नितीन गडकरींनीही मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांचं खडंन केले आहे.