Nana Patole : सध्याच्या सरकारमध्ये जे काही सुरू आहे, त्यामध्ये दुरुस्ती करण्याची वेळ आली असून 10 मार्चनंतर हे काम करणार असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


भंडाऱ्यामध्ये नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये अनेकांनी पक्ष प्रवेश केला. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा झाली आहे. पाच राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे 10 मार्चनंतर सरकारमध्ये बदल पाहायला मिळतील असे सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केले. त्यामुळे नाना पटोले 10 मार्चनंतर नेमकी कोणती पावले उचलणार आहे, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 


महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसची भूमिका दुय्यम झाली असल्याची चर्चा सुरू असते. त्यानंतर आता नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतर सरकारमध्ये नाना पटोले कोणते बदल करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 


स्त्रीयांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्याला भाजपचा पाठिंबा


आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधीबाबत केलेल्या वक्तव्याला भाजपचा पाठिंबा आहे असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले. आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वास यांनी उत्तराखंडमधील प्रचारसभेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा भाजपच्या एकाही नेत्याने निषेध केला नाही. यातूनच भाजपची मनुवादी मानसिकता दिसत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकसभेत काँग्रेसवर निशाणा साधताना महाराष्ट्रातून देशभरात कोरोना पसरवण्यासाठी काँग्रेसने श्रमिकांना मोफत तिकिट दिले असल्याचा आरोप केला होता.  याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसने पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन पुकारले आहे. काही जिल्ह्यांमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आले होते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha