मुंबई : मुख्यमंत्रिपदासह सत्तेचं समसमान वाटप व्हावं हीच शिवसेनेची भूमिका आहे. भाजपने दिलेला शब्द पाळला पाहिजे, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आक्रमक सूर आळवला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते.

सत्तास्थापना आणि खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतल्याची चर्चा होती. महायुतीचं सरकार हे राज्यासाठी भल्याचं असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. याबाबत ते म्हणाले की "शिवसेनेने एक पाऊलही मागे घेतलेलं. जे हक्काचं आहे, न्यायाचं आहे ते आम्ही मागतोय. मी फक्त एवढंच म्हणालो की, या क्षणी युती आहे आणि युतीत बोलणी होऊ शकते. यात नरमाईची भूमिका कशी झाली म्हणता?"

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अमित शाह यांच्यासमोर म्हणाले होते की, सत्तेच्या पदांचं समसमान वाटप होईल. या अर्थ काय होतो? सत्तेच्या पदात मुख्यमंत्रिपद येत नाही का? मुख्यमंत्रिपद एनजीओचं पद आहे का? ते सत्तेचं पद आहे. उद्धव ठाकरेही 50-50 पॉवरशिप म्हणाले होते, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

मुनगंटीवारांना देव बुद्धी देवो!
शिवसेनेची भूमिका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असं वक्तव्य अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीन मुनगंटीवारांनी केलं होतं. यासंदर्भात संजय राऊत म्हणाले की, "सुधीर मुनगंटीवार स्वत:च्या पक्षाविषयी बोलत असावेत. ते आमच्याविषयी बोलत नाहीत. विनाशकाले विपरीत बुद्धी हे शब्द कदाचित त्यांनी भूमिका फिरवल्यावरुन वापरले असतील. देव त्यांना बुद्धी देवो."

5 नोव्हेंबरला शपथविधी होणार?
येत्या 5 नोव्हेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, आज दुपारीच शपथविधी करा, आम्ही कुठे थांबवलंय, पाच नोव्हेंबरपर्यंत कशाला थांबायचं. आज कोणत्याही पक्षाकडे 145 आमदारांच्या समर्थन पत्र असेल ते शपथ घेऊ शकतात, आजही लोकशाही आहे.