Maharashtra Assembly Session 2023: काँग्रेसचे (Congress) नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तर यावेळी विदर्भाचे नेते विरोधीपक्ष नेते झाल्याचं म्हणत त्यांनी विदर्भाचे कौतुक केले आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'आमचे मुख्यमंत्री देखील विदर्भाचे आहेत. त्यामुळे विदर्भ हे पाहुणाचारामध्ये सर्वोत्तम आहे.' तसेच सभागृहाला एक चांगला विरोधीपक्ष नेता लाभल्याची भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे. पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटंल की, अधिवेशन सुरु होण्याआधी आपण विरोधी पक्षनेता निवडायला हवा होता त्यामुळे आपण वडेट्टीवारांवर अन्याय केला आहे. 


वडेट्टीवार वर्क फ्रॉम होम करणारे नेते नाहीत - मुख्यमंत्री शिंदे


मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा टोला लगावला आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'विजय वडेट्टीवार वर्क फ्रॉम होम करणारे नेते नाहीत. ते रस्त्यावर येऊन उतरुन काम करणारे नेते आहेत. हिंमत लागते रस्त्यावर उतरुन काम करायला. आम्ही तेच केलं आहे. संकट आलं तर लपायचं नसतं तर संकटाला सामोरं जायचं असतं.'


तुमचं काम झाल्यावर तुमचा पक्ष तुम्हाला विसरणार नाही हीच अपेक्षा असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. तर  2024 मध्ये आमचं सरकार पुन्हा सत्तेत येणार आहे तेव्हा देखील तुम्हीच विरोधी पक्षनेते व्हाल अशी मिश्किल टिप्पणी देखील मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान केली आहे. वडेट्टीवार हे मूळचे शिवसैनिक असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. तर त्यांची सुरुवात ही बाळासाहेबांच्या शिवसेनेपासून झाली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. काहींना बाळासाहेबांचा सहवास लाभूनही विचार घेता आले नाहीत असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. 


'...तर तुम्ही का घाबरलात?'


आम्ही वडेट्टीवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी आमच्यात यावं असा अर्थ नव्हता अशी टिप्पणी देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.  विरोधी पक्षनेते हा पावफुल्ल असतो त्यामुळे तुम्ही तुमचं काम चोख करा असा सल्लाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय वडेट्टीवारांना दिला आहे. 


वडेट्टीवारांना ना - ना म्हणू नका - मुख्यमंत्री शिंदे


मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देखील टोला लगावला आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं की, नाना आता वडेट्टीवारांच्या कामामध्ये आडकाठी आणू नका, त्यांना सारखं ना - ना म्हणू नका. 


'विरोधी पक्षनेता हा राज्याचा भावी मुख्यमंत्री असतो'


मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या भाषणावेळी आर.आर.आबा यांनी त्यांच्या विरोधीपक्षनेते पदाच्या निवडीवेळी केलेल्या भाषणाचा उल्लेख केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, आर. आर. आबांनी त्यांच्या भाषणावेळी म्हटलं होतं की विरोधीपक्षनेता हा भावी मुख्यमंत्री असतो.


हेही वाचा : 


Maharashtra Assembly Session 2023: विजय वडेट्टीवार नवे विरोधी पक्ष नेते, सभापतींची घोषणा; सभागृहाकडून अभिनंदन