सोलापूर : काँग्रेस-राष्ट्रवादी विलिनीकरणाबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित येणार असल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते.


काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघेही थकले आहेत. कधीकाळी आम्ही एका आईच्या मांडीवर वाढलो आहोत. आमच्याही मनात खंत आहे आणि त्यांच्याही (शरद पवारांच्या) मनात खंत असेल, मात्र ते बोलून दाखवत नाहीत. मात्र याची सुरुवात आज सोलापुरातून झाली आहे, असं शिंदे यांनी म्हटलं.



काँग्रेसच्या पडत्या काळात सुशीलकुमार शिंदे यांचं आलेलं वक्तव्य सहज आलेलं नाही. सध्या देशात आणि राज्यात काँग्रेसची अवस्था बिकट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेतेही पक्षाला सोडून जात असल्याने मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीतही शरद पवार मोठ्या उत्साहात एखाद्या तरुणासारखे राज्यभर दौरे करत आहेत. शरद पवार पक्षात एक नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न करत आहेत.


काँग्रेसची परिस्थिती नेमकी याउलट आहे. काँग्रेसमध्ये मोठी निराशेची लाट पसरली आहे. काँग्रेसला पुन्हा भरारी घेण्यासाठी सक्षम नेतृत्त्वाची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलिन केल्यास शरद पवारांच्या रुपाने मोठं नेतृत्व पक्षाला मिळू शकतं. ही बाब लक्षात घेऊन सुशीलकुमार शिंदेंचं हे वक्तव्य आल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.