पिंपरी- चिंचवड : राज्यात आतापर्यंत कुठेही न झालेली महाआघाडी चिंचवड आणि भोसरी विधानसभेत होण्याची दाट शक्यता आहे. चिंचवड आणि भोसरी विधानसभेतील अपक्ष उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आहे. विधानसभेच्या तोंडावर ही भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.


चिंचवड आणि भोसरी विधानसभेतील अपक्ष उमेदवारांनी वंचित आघाडीने पाठिंबा द्यावा अशी मागणी दोन्ही उमेदवारांनी केली. चिंचवडमध्ये भाजपच्या लक्ष्मण जगतापांच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली आहे. तर भोसरीत महेश लांडगेच्या विरोधातील अपक्ष विलास लांडे रिंगणात आहेत. कलाटे आणि लांडेंना राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या एका गटाने पाठिंबा दिला आहे.


मनसे आणि नाराज काँग्रेसची मनधरणी सुरु आहे आणि त्यातच आंबेडकरांची भेट घेतल्याने विरोधकांची एकमुठ बांधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आंबेडकरांनी त्यांचा निर्णय तूर्तास तरी सर्व गुलदस्त्यात ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


चिंचवड आणि भोसरी विधानसभा निवडणूक लढतीबाबत २०१४ च्या लढतींची पुनारावृत्ती झाली आहे. चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे राहुल कलाटे प्रतिस्पर्धी होते. भोसरीत अपक्ष महेश लांडगे आणि राष्ट्रवादीचे विलास लांडे आमने सामने होते. कलाटे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्याने ते आता राष्ट्रवादीचे पुरस्कृत आहे. तर राष्ट्रवादीने विलास लांडे यांना पुरस्कृत केले असून त्यांचा सामना महायुतीतील भाजपचे महेश लांडगे यांच्याशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.