सिंधुदुर्ग :भाजपवासी झाल्यानंतर नितेश राणे त्यांनी चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीनिमित्त होणाऱ्या मेळाव्याला हजेरी लावली. देवगडच्या जामसंडे येथे संघाकडून विजयादशमीनिमित्त संचलन केले जाते. यावेळी कार्यक्रमातील नितेश राणे यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.

नितेश राणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांबरोबर मांडी घालून जमिनीवर बसल्याचे दिसून आले. हे पाहून राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षातील संस्कृती तेवढीशी मानवली नव्हती. मात्र नितेश राणे यांनी भाजपवासी झाल्यानंतर स्वत:मध्ये बदल केल्याचे दिसत आहे. या कार्यक्रमाला नितेश यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हेदेखील उपस्थित होते. नितेश राणे सध्या भाजपची संस्कृती समजावून घेताना दिसत आहेत.

नितेश राणे 3 ऑक्टोबर रोजी कणकवलीच्या भाजप कार्यालयात जाऊन भाजपच्या सदस्यत्वाचा नोंदणी अर्ज भरला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्याशिवाय दुसरा कोणताही मोठा नेता यावेळी उपस्थित नव्हता. नितेश राणे यांनी 1 ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता.

नितेश राणे आणि नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात विरोध होता. हा विरोध लक्षात घेऊन भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर नितेश राणे यांचा आज अखेर भाजपात प्रवेश झाला आहे. नितेश राणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं.

राणे विरोधकांची एकत्रित मूठ
नितेश राणे यांना भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारी मिळाली असली तरी आज पूर्वाश्रमीचे राणेंचे सहकारी संदेश पारकर राणेंच्या आधीच भाजपवासी झाले होते. मात्र नितेश राणे यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे संदेश पारकर आता नितेश राणेंविरोधात उमेदवारी अर्ज भरला आहे. दुसरीकडे अलिकडे राणेंना सोडून गेलेले सतीश सावंत हे देखील नितेश राणे विरोधकांची एकत्रित मूठ बांधून त्यांच्याविरोधात उभे राहतील अशी चर्चा आहे.