Sachin Sawant On BJP : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित मालमत्ता ईडीने जप्त केल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेवर भाजपने टीकास्त्र सोडले असताना दुसरीकडे महाविकास आघाडीनेदेखील भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावरील कारवाई ही भाजप राजकारणातील अंडरवर्ल्ड डॉन असल्याचे दर्शवत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी ट्वीट करून भाजपवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यांवरील ED ची कारवाई भाजपा राजकारणातील अंडरवर्ल्ड डॉन झाला आहे हे पुन्हा दर्शवते. पूर्वी डॉन जागा बळकावण्यासाठी गुंड पाठवायचे. मोदी सरकार सत्ता बळकावण्यासाठी तपास यंत्रणा पाठवते. सन 2014 ते 2022 मध्ये ED ने 2974 धाडी उगीच टाकल्या नाहीत. मात्र, यामध्ये भाजपशी संबंधित एकही जण नसल्याचे सावंत यांनी म्हटले.
पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी वाधवानकडून 20 कोटी देणगी कशी मिळाली? हा काळा पैसा नाही का असा प्रश्न उपस्थित करत सावंत यांनी भाजप अध्यक्षांची चौकशी करण्याची मागणी केली. आधुनिक दुर्योधन व दुःशासन लोकशाहीचे वस्त्रहरण करताना संविधानिक संस्था भीष्माचार्य व द्रोणाचार्याप्रमाणे साथ देत आहेत. धृतराष्ट्राप्रमाणे कायदेव्यवस्था वागते हे देशाचे दुर्दैव असल्याचेही सावंत यांनी म्हटले.
किरीट सोमय्यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर आता युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आले आहेत. किरीट सोमय्या यांनी ईडीने केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने थेट ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. सगळी प्रकरणे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रात्रीची झोप उडणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी म्हटले.
ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची सुमारे 6 कोटींची मालमत्ता जप्त केली. ईडीने मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर कारवाईने केल्याने मोठी खळबळ उडाली होती. किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत ठाकरे कुटुंबावर आरोप करताना म्हटले की, ठाकरे कुटुंबीय आणि अन्वय नाईक यांच्या जमिनी व्यवहाराबाबत माहिती दिली होती. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. आता ईडीच्या कारवाईबाबत तरी बोलतील का, असाही सवाल त्यांनी केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या: