ED Raid on Shridhar Patankar : सध्या राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवायांचा सपाटा लावल्याचं दिसत आहे. या तपास यंत्रणांच्या रडारवर सध्या राजकीय नेतेमंडळी आणि त्यांचे निकटवर्तीय असल्याचं दिसत आहे. आता तर तपास यंत्रणांनी आपला मोर्चा थेट ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीयांकडे वळवला आहे. ईडीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या मालमत्तांवर कारवाई केली आहे.
सध्या राज्यभर प्रकरण गाजतंय ते ईडीनं मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित कंपन्यांवर सुरु केलेल्या कारवाईचं. मात्र या सगळ्या प्रकरणाचं कनेक्शन 2016 मधल्या नोटबंदीशी असल्याचं कळत आहे. नोटबंदीच्या काळात जुन्या नोटांच्या बदल्यात सोन्याचे व्यवहार झाले. आणि अशाच एका व्यवहाराप्रकरणी पुष्पक ग्रुपच्या चंद्रकांत पटेलांना अटक झाली होती. आणि याच पुष्पक ग्रुपनं श्रीधर पाटणकर यांच्याशी आर्थिक व्यवहार केल्याचा ईडीला संशय आहे.
2016 ला झालेल्या नोटाबंदीमुळे मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांची अडचणी वाढल्याचं दिसत आहे. नोटबंदीनंतर झालेल्या सोन्याच्या व्यवहाराप्रकरणी पुष्पक ग्रुपच्या मालकांना 2018मध्ये अटक करण्यात आली होती. याच पुष्पक ग्रुपनं उद्धव ठाकरेंच्या मेहुण्यांच्या कंपनीत पैसे गुंतवल्याचा ईडीला संशय आहे. पाहुयात नोटबंदीनंतर मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांच्या अडचणी नेमक्या कशा वाढल्या?
पाहा व्हिडीओ : 2016 ला झालेल्या नोटाबंदीमुळे पाच वर्षानंतर मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांची अडचण
नोटाबंदीच्या 5 वर्षानंतर का झाली श्रीधर पाटणकरांच्या अडचणीत वाढ?
8 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी केली होती. त्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ माजली होती. यानंतर पैशांच्या बदल्यात सोनं खरेदी केल्याच्या घटना समोर आल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. यावेळी पुष्पक बुलियन ग्रुपनंही अशा प्रकारे सोनं विकल्याच्या तक्रारीत ईडीनं 6 मार्च 2017 ईडीनं केस दाखल केली होती. पुष्पक बुलियनच्या पिहू गोल्ड आणि सतनाम गोल्ड अशा दोन कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्यांच्या अकाऊंटमध्ये मोठे ट्रान्झॅक्शन आढळल्यानं पुष्पक बुलियन ईडीच्या रडारवर आलं होतं. यासंदर्भात ईडीनं चौकशीही सुरु केली होती.
ईडीच्या चौकशीत जुन्या नोटांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात सोनं विकल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं होतं. सतनाम आणि पिहू गोल्डमध्ये 84 कोटी रुपये आले होते. ते पुष्पक बुलियननं आपल्याचं कंपनीतून दिले होते. या प्रकरणात पुष्पक ग्रुपचे मालक चंद्रकांत पटेल यांना 2018 ला अटक झाली होती. तसेच याप्रकरणी आरोपपत्र दाखल झालं होतं. मात्र अजूनही पुष्पक ग्रुपकडे 84 कोटी कुठुन आले आणि कुणी दिले हे समोर आलं नाही. ईडीला या प्रकरणात राजकीय कनेक्शन असल्याचा संशय आहे. त्यामुळे मोठी कारवाई करण्याच्या ईडी तयारीत आहे.
श्रीधर पाटणकरांवर कारवाई का?
चंद्रकांत पटेल आणि महेश पटेल यांनी संगनमताने पुष्पक रिएलिटी या पुष्पक ग्रुपमधील कंपनीमधील तब्बल 20 कोटी रुपयांची रक्कम नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यामार्फत वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमध्ये गुंतवले. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीच्या हमसफर डीलर प्रा. लि. या केवळ कागदोपत्री असलेल्या कंपनीमार्फत श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती या कंपनीला 30 कोटी रुपये बिगर तारण कर्ज दिल्याचं दाखवलं. पुष्पक ग्रुपच्या महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मदतीने साईबाबा गृहनिर्मिती प्रकल्पात अवैध रक्कम गुंतवल्याचा आरोप ईडीच्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :