भंडारा : काँग्रेस पक्षाने (Congress) जो पक्षाचा वचननामा तयार केला तो अतिशय विचारपूर्वक आणि जनतेचे मत लक्षात घेऊन तयार केला आहे. मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मोजक्या अब्जाधीशांसाठी, उद्योगपतींसाठी हे सरकार चालवले आहे. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे अदानी यांचे आहे. आज त्यांच्या शेअरची किंमत तपासल्यावर असे लक्षात येईल कि मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर त्यांच्या शेअरची किमती दुपटीने वाढले आहेत. तिकडे देशात सरकारला भाजप मोदी सरकार (Modi Government) म्हणून संबोधित आहे. मात्र खऱ्या अर्थाने हे सरकार मोदी सरकार नसून हे अदानी सरकार असल्याची घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. आज भंडारा येथे आयोजित महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत राहुल गांधी बोलत होते. 


देशात एकप्रकारे चेष्टा सुरू


पूर्वी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ एका समूहाच्या नावावर होते. मात्र, कालांतराने त्यांच्यावर सीबीआयची चौकशीच्या अनेक धमक्या आणि दबाव आणून ते विमानतळ अदानी समूहाच्या हातात सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर   मात्र तत्कालीन सर्व कारवाया बंद पडतात आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे विमानतळ अदानी समूहाकडे जातं. हा प्रकार केवळ एका विमानतळापुरता मर्यादित नसून हे आज देशात सर्व क्षेत्रात झालेले आहे. देशात कधी हिंदू-मुस्लिम विरोधात तर कधी एका जातीचे दुसऱ्या जाती समूहासोबत भांडण लावून राजकारण केल्या जातं. या भानगडीत जनतेला व्यस्त करत त्यांच्याकडून कर स्वरूपात सर्वसामान्यांचे पैसे उकळण्याचे काम केले जात असल्याचेही राहुल गांधी म्हणाले. मी देशभरात प्रवास केला. दरम्यान, कन्याकुमारी ते कश्मीर असा चार हजार किलोमीटरच्या प्रवासादरम्यान मी सर्व स्तरातील नागरिकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान अशी एक  गोष्ट लक्षात आली की देशातील सर्वात मोठा मुद्दा हा बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव इत्यादी प्रमुख प्रश्न समोर आहे.


मात्र आज घडीला यावर कोणीही बोलायला तयार नाही. प्रसारमाध्यमे देखील यावर बोलायला तयार नाही सर्वसामन्यांच्या प्रश्नांना डावलण्यात आले आहे. मात्र,  दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी समुद्रखाली मंदिरामध्ये पूजा करतांना टीव्हीवर दिसत असतात. कोरोनाकाळात भयान संकट आले. लाखो लोकांचे त्यात जीव गेले. तेव्हा तसे होत असताना पंतप्रधान देशातील नागरिकांना थाळी वाजवायला, घरात राहायला सांगत होते. सर्वसामान्यांच्या जीवाची कुणालाही परवा नसून देशात एकप्रकारे चेष्टा सुरू असल्याची घणाघाती टीकाही राहुल गांधी यांनी सरकारवर केला आहे. 


देशातील प्रसारमाध्यमे जनतेचे प्रश्न उचलून धरत नाही


पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी समूहाचे समजतात. मात्र  या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे मागास वर्गातील किती लोक या देशात आहे. ओबीसी, आदिवासी, दलित इत्यादि किती आहेत, याची आकडेवारी कुणाकडेही नाही. मात्र एक गोष्ट मी ठामपणे सांगू शकतो जितकी तुमची जातीय जनगणनेनुसार लोकसंख्या आहे, तितकी भागीदारी या देशात तुमची नाही. देशातील प्रसारमाध्यमे देखील जनतेचे प्रश्न उचलून धरत नसल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.मात्र याच प्रसारमाध्यमातील वरिष्ठ अधिकारी आणि संपादक यांची जर यादी तपासली, तर यात एकही आदिवासी, दलित किंवा मागासवर्गातील व्यक्ती आढळून येणार नाही. त्यामुळे हे सर्वसामान्यांच्या हक्कांच्या गोष्टी बोलत नसल्याचेही राहुल गांधी म्हणाले. त्याचप्रमाणे  भारतातील 200 मोठ्या कंपन्यांची यादी बघितली तर असे लक्षात येईल की, त्यातही एकही ओबीसी, आदिवासी, दलित समूहातील व्यक्ती आढळून येणार नाही. हे चित्र जवळ जवळ सर्व क्षेत्रांमध्ये आज तयार झाले असल्याचेही राहुल गांधी म्हणाले. 


पंतप्रधान कोणते ओबीसी? 


आजघडीला देशात 90 अधिकारी बजेटचा वाटप करतात. कुठल्या क्षेत्रात किती पैसा जाईल हे ते ठरवत असतात. या 90 अधिकाऱ्यांमध्ये एक नाव  दलित आहे. एक नाव आदिवासी तर तीन नाव हे ओबीसी समूहाचे आहे. जेव्हा तुमची लोकसंख्या 50% असल्यावर  केवळ मोजकेच अधिकारी या पदावर बसले आहेत. त्यामुळे जेव्हा देशात शंभर रुपयांचा वाटप होतो तेव्हा केवळ 6 रुपये 10 पैसे  तुमच्या वाट्याला येत असतात. असे असताना पंतप्रधान स्वतःला ओबीसी म्हणून घेत आहेत. ते कोणते ओबीसी आहेत, यांनी सर्वसामान्यांसाठी काय योजना आखल्या, असे अनेक प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागले.


इतर महत्वाच्या बातम्या