Rahul Gandhi, Congress : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राहुल गांधींची तुलना साक्षात प्रभू रामचंद्रांसोबत केलेली आहे. ज्याप्रमाणे प्रभू रामाने सुद्धा वनवास भोगला आणि प्रवास केला. ते सुद्धा राजकुमार होते आणि राहुल गांधी सुद्धा राजकुमार आहेत, त्यामुळे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही रामाच्या वनवासाप्रमाणेच आहे, अशी तुलना आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करून राहुल गांधी यांची तुलना थेट प्रभू रामचंद्र यांच्याशी केली आहे.


भाजप हा बहुजनांचा पक्ष नाही, भाजपात बहुजनांना त्रास दिला जातो -  नाना पटोले 


भाजपमध्ये बहुजनांना त्रास दिला जातो त्यामुळे भाजप हा बहुजनांचा पक्ष नाही हे मी स्वतः त्या पक्षात राहून अनुभवलेलं आहे. भाजपमधील अनेक नेते जसे पांडुरंग फुंडकर , गोपीनाथ मुंडे , एकनाथ खडसे व आता पंकजा मुंडे यांना ज्या प्रकारे भाजप त्रास देत होतं व आहे. तर हे  बहुजनांचे नेते आहेत आणि त्यांच्यासोबत भाजपने काय केलं, हे देशातील जनता जाणून आहे. त्यामुळे भाजपचा आणि बहुजनांचा दुरून दुरूनही संबंध नाही, असे वक्तव्य नाना पटोले यांनी आज खामगाव येथे केला आहे.


 हे सरकार येत्या डिसेंबर मध्ये कोसळणार, नाना पटोले यांचा दावा
हे ईडीचे सरकार असून राज्यातील हे सरकार येत्या डिसेंबर पर्यंत कोसळणार असल्याचंही सूतोवाच नाना पटोले यांनी आज केलं आहे. ईडीचे सरकार हे जास्त दिवस टिकणार नसून डिसेंबरमध्ये या सरकारचा अंत होणार असल्याचही यावेळी त्यांनी सांगितले आहे. 


नाना पटोलेंच्या वक्तव्यावर भाजपचं प्रत्युत्तर, चंद्रशेखर  बावनकुळे काय म्हणाले?


नाना पटोले यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. हिंदुत्ववादी विचाराचे विरोधी असलेले राहुल गांधी यांची तुलना प्रभू रामचंद्राशी करणे आणि पीएफआय सारख्या संघटना या देशात आणणाऱ्या काँग्रेसच्या नेत्याला प्रभू रामाचा दर्जा देणे योग्य नाही. नाना पटोले हे केवळ प्रकाशझोतात राहण्यासाठी आणि काँग्रेसचे अध्यक्षपद टिकवण्यासाठी लांगुलचालन करतात, असा टोला  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.