Diwali Bonus : मुंबई महापालिकेचे कर्मचारी (bmc employee), महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना 22 हजार 500 रूपये तर आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस म्हणून दिला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी याची घोषणा केली.
मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोनस बाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे गुरुवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबई महापालिकेचे 93 हजार आणि बेस्टचे 29 हजार कर्मचाऱ्यांसह, शिक्षक, आरोग्य सेविका यांना दिवाळी बोनस मिळणार आहे.
'कोविडच्या बिकट परिस्थितीत मुंबई महापालिकेचे कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. विकास कामांवर खर्च केलाच पाहिजे पण चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे' असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना ' आनंदात दिवाळी साजरी करा. पण सगळ्यांनी मुंबईकरांसाठी मनापासून काम करा,' असे आवाहन केले.
आज झालेल्या बैठकीला खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्र्विनी भिडे, माजी आमदार किरण पावसकर, महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आदी तसेच संदीप देशपांडे, शशांक राव, संतोष धुरी, उत्तम गाडे, अशोक जाधव यांच्यासह पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोविडच्या बिकट परिस्थितीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. मुंबईतील कोविडची परिस्थिती नियंत्रणात राखण्यात डॉक्टर्स, सर्व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. विकास कामांवर खर्च झालाच पाहिजे. पण चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन ही मिळाले पाहिजे. विकास काम आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याण योजना यांचा समतोल राखावा लागेल. कर्मचारी आणि नागरिक आपलेच आहेत.'
दिवाळी बोनसची घोषणा करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आनंदात दिवाळी साजरी करा. मुंबई महापालिकेशी निगडीत विकास कामांतील तसेच कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी या प्राधान्याने सोडविल्या जातील. सगळ्यांनी आता मुंबईकरांसाठी मनापासून काम केले पाहिजे. रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे नागरिकांच्या मनासारखी दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी अभियंत्यांपासून ते सर्वांनीच दक्षता घ्यावी.
बैठकीत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठीची 'श्रमसाफल्य' आणि 'आश्रय' या योजनेतील घरे उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. विविध विकास यंत्रणांना सोबत घेऊन अशी घरे मोठ्या संख्येने उपलब्ध व्हावीत यासाठी स्वतंत्र समन्वय बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.