Congress Leader Ashok Chavan, Majha Maharashtra Majha Vision 2023: 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपलं राज्यासाठीचं व्हिजन मांडलं. अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. तसेच, गेल्या अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यासंदर्भातही पुन्हा एकदा अशोक चव्हाणांनी आपली बाजू स्पष्ट केली. तसेच, 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या 'प्लान सी'बाबत विचारलं होतं. त्यावर बोलताना अशोक चव्हाणांनी 'प्लान आर'नं उत्तर दिलं. 


प्रश्न : भाजपकडे एक प्लॅन  होता, तो म्हणजे अजित पवार. मग 'प्लान बी' होता, तो म्हणजे, एकनाथ शिंदे. आता त्यांच्याकडे 'प्लान सी' आहे, तो म्हणजे अशोक चव्हाण असल्याचं सांगितलं जातं. आपण अनेकदा म्हटलंय की, आपण भाजपमध्ये जात नाहीये, पण भाजपनं  आपल्याला संपर्क केलाय का? 


उत्तर : "प्लान सी' आणि आता 'प्लान आर' आता इथे उपस्थित आहे. राज ठाकरे... मला तुम्ही विचाराल, तर असा कोणताही प्लान नाहीये. मला वाटतं की, माझ्यापेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 'प्लान सी'बाबत त्यांचं मत स्पष्ट केलं आहे. कुठलाही तसा विषय नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की की, महाराष्ट्रामध्ये आम्ही राजकीय विरोधक आहोत एकमेकांचे, पण वैयक्तिक विरोध असण्याचं कारणच नाहीये. जर माझे राज ठाकरेंशी चांगले संबंध असतील त्यांचा पक्ष वेगळा, त्यांची वैचारिक भूमिका वेगळी, माझी भूमिका वेगळी, देवेंद्र फडणवीसांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका वेगळी. पण आपसांत काय आम्ही नेहमी भांडत राहावं? ही अपेक्षा चुकीची.", असं अशोक चव्हाण म्हणाले. 


पाहा व्हिडीओ : Ashok Chavan Majha Vision : भाजपच्या प्लॅन 'ए' 'बी' आणि 'सी' बद्दल अशोक चव्हाणांचं मत काय?



अशोक चव्हाणांचं राज्यासाठी व्हिजन काय? 


"विकास एक निरंतर राजकीय प्रक्रिया आहे, या मताचा मी आहे. पण तो गतीनं व्हावा, राज्य कोणाचंही असो, कोणत्याही पक्षाचं असो आणि कोणीही राज्यकर्ता असो. पण महाराष्ट्र हा देशात अग्रेसर राहिला पाहिजे, हिच आमची प्रामाणिक भूमिका आहे आणि त्याच भूमिकेतून या कार्यक्रमात आम्ही सर्व सहभागी झालो आहोत. महाराष्ट्राचा सुवर्णकाळ आपण सर्वांनी पाहिलाय. मी लहानपणापासूनच ही सर्व प्रक्रिया मी जवळून पाहिलीये. स्वर्गीय वसंतराव नाईकांपासून ते विलासराव देशमुखांपर्यंत जो कार्यकाळ तो सर्व मी पाहिलाय. त्यानंतर उद्धव ठाकरेंसोबतही मी काम केलं आहे. यासर्व राजकीय चढ उतारांमध्ये राज्यात जे काही घडलंय, तेही मी अनुभवलंय. त्यामुळे राजकीय भूमिका बाजूला ठेवून महाराष्ट्र हा सदैव समोर राहिला पाहिजे. एक म्हण असायची की, हिमालयाच्या मदतीला जर कोणी गेलं असेल, तर तो महाराष्ट्र गेलाय.", असं अशोक चव्हाण म्हणाले. 


देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचं योगदान 15 टक्के आहे. थेट परकीय गुंतवणुकीत 31.4 टक्के योगदान राज्याचं आहे. तर महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न 2 लाख 84 हजार रुपये आहे. सर्वाधिक तरुण लोकसंख्या ही महाराष्ट्रातच आहे. त्यामुळे विकास हा समतोल झाला पाहिजे, असं मला वाटतं. राज्यासमोरचा ज्वलंत प्रश्न म्हणजे, बेरोजगारी. 2020 ते 2021 मधील आकडेवारीनुसार, शहरी भागांत 6.5 टक्के आणि राज्याच्या ग्रामीण भागांत 2.2 टक्के आहे. त्यामुळे आपला प्राईम फोकस हाच असला पाहिजे. आमच्या सरकारच्या काळात आम्ही हेच लक्ष्य ठेवलं होतं. तसंच लक्ष्य विद्यमान सरकारच्या काळात राहील अशी अपेक्षा निश्चितच करावी लागणार आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले. विलासराव आणि गोपीनाथ मुंडेंनंतर मराठवाड्याचा महाराष्ट्रातला आणि देशातला आवाज म्हणजे अशोक चव्हाण. महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याचा दुर्मिळ योग चव्हाण कुटुंबाला अनुभवायला मिळाला. अत्यंत कठीण काळात महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्वही अशोक चव्हाणांनी केलं. महाविकास आघाडीच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचं जाळं तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न शिवसेनेतल्या राजकीय भूकंपामुळे अपुरा राहिला. केंद्रात आणि राज्यात काँग्रेस क्षीण झालेली असताना महागाई, बेरोजगारी, मंदीचं सावट, उद्योगांची उपेक्षा अशा संकटामधून महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी त्यांचं आणि पक्षाचं नेमकं काय व्हिजन आहे? नुकतीच भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून गेली, त्याचा पक्षातील नेत्यांना जोडण्यासाठी काय फायदा होईल? काँग्रेसमध्ये कायम टप्पा पडेल अशी भीती व्यक्त होते, त्यामागचं वास्तव काय आहे? आणि 2024 साठी पक्षाचा आणि अशोक चव्हाण यांचा रोडमॅप कसा असेल? यासंदर्भात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी  'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' कार्यक्रमात आपली मतं मांडली. 


महाराष्ट्रात (Maharashtra News) सध्या बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांचं संयुक्त सरकार आहे. मात्र, असं असलं तरी गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यानं पाहिलेलं अभूतपूर्व राजकीय बंड, आणि त्यानंतरचे आरोप प्रत्यारोपांच्या तोफा अद्याप थंडावलेल्या नाहीत. अशा तोफांचा सामना करतानाच राज्याच्या विकासात कसूर न करता राजकीय लढाई लढत राहणं हा समतोल सध्या सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही करावा लागत आहे. अशात पुरोगामी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना राज्यातल्या सद्यस्थितीबाबत काय वाटतंय. अशा परिस्थितीत राज्याच्या प्रगतीची दिशा कशी असेल. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी या नेत्यांचं व्हिजन काय असेल याबद्दल या सर्व नेत्यांशी आज दिवसभर आम्ही दिलखुलास संवाद साधणार आहोत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


'प्लान ए' अजित पवार, 'प्लान बी' एकनाथ शिंदे... आता 'प्लान सी' अशोक चव्हाण? फडणवीस म्हणाले...