मुंबई : येत्या दोन दिवसात शिवसेना-भाजप युतीच्या अधिकृत चर्चेला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा जागावाटपाची चर्चा एकत्र व्हावी की नाही यावर युतीच्या चर्चेचं घोडं अडल्याचं म्हटलं जातं.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या नाहीत, तरी जागावाटप आधीच निश्चित करावं, यावर शिवसेना ठाम आहे. तर लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्ता परिवर्तन झालं, तर शिवसेना विधानसभेत सोबत राहील का? असा भाजपचा शिवसेनेला सवाल आहे.

शिवसेनेकडून अद्याप कुठलीही 'कमिटमेंट' भाजपला देण्यात आलेली नाही. मात्र येत्या दोन दिवसात भाजप युतीचा अधिकृत प्रस्ताव देणार आहे, त्यानंतर चर्चेचं अडलेलं घोडं पुढे सरकण्याची चिन्हं आहेत. 28 जानेवारीला भाजपच्या राज्य कार्यकरिणीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या वाटाघाटीसाठी हालचाली सुरु आहेत.

युतीबाबत अनिश्चितता असल्याने शिवसेनेच्या खासदारांमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता पसरल्याचं म्हटलं जात आहे.  भाजपसोबत युती झाली नाही तर 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेची परिस्थिती केविलवाणी होऊ शकते, असं अनेक शिवसेना खासदारांचं मत आहे.

इतकंच नाही, तर युती केली नाही तर आम्ही लढणार नाही, असं किमान पाच खासदारांनी सांगितल्याचंही बोललं जात आहे. मात्र  "ज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका," असे स्पष्ट आणि खडे बोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांना सुनावले आहेत.

शिवसेना-भाजप युतीमागचा खरा वाद हा जागांचा नसल्याचं मानलं जातं. भाजपकडून शिवसेनेला सन्मानाची वागणूक न मिळाल्यामुळे ठेचलेल्या स्वाभिमानाचं कारण आहे. मोठा भाऊ गेल्या निवडणुकीत छोटा झाल्यामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी असल्याचंही म्हटलं जातं.