नागपूर : नागपूरमध्ये काँग्रेस (Nagpur Congress) आणि भाजप (BJP) कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली असून पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरासमोर पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसनं आंदोलन सुरु केलं आहे. याचवेळी गडकरींच्या घराखाली भाजपचेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील जमा झाले आहेत. यामुळं तणाव वाढला आहे.
देशात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलं होतं. त्याविरोधात काँग्रेसनं राज्यभर आंदोलन केलं होतं. आज नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी नितीन गडकरींच्या घरासमोर आंदोलन केलं. मोदी सरकार मुर्दाबादच्या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. तसंच महाराष्ट्राचा अपमान सहन केला जाणार नाही, मोदींनी देशाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
तर दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर भाजप कार्यकर्ते देखील झेंडे घेऊन उभे ठाकल्याचे चित्र होते. जय श्रीराम, पंतप्रधान मोदी जिंदाबाद अशी घोषणाबाजी भाजप कार्यकर्ते करत होते.
नेमकं काय घडलं...
कोरोना प्रादुर्भावासाठी महाराष्ट्र जबाबदार असल्याचं वक्तव्य करणाऱ्या पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यावरून भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आमनेसामने आले. आज नागपुरात काँग्रेस कार्यकर्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात आंदोलनासाठी त्यांच्या निवासस्थानासमोर आले. मात्र आधीपासूनच तिथे भाजप कार्यकर्त्यांची गर्दी होती त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला काँग्रेस तर दुसऱ्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते असं चित्र दिसून आलं.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्यांची अधिक
- Amravati Municipal Commissioner: मनपा आयुक्तांवर शाईफेक करणाऱ्यांना खासदार नवनीत राणांसह आमदार रवी राणांचे समर्थन