मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास सज्ज आहेत. गेल्या वेळी पराभवाचा फटका बसल्यानंतरही काँग्रेसने सुशीलकुमार शिंदेंना पुन्हा तिकीट देण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे 77 वर्षीय सुशीलकुमार शिंदेंना उमेदवारी देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पक्षाचा नियमही वाकवला.

2014 मधील लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून भाजप कार्यकर्ते शरद बनसोडे खासदारपदी निवडून आले. बनसोडे मोदीलाटेवर स्वार होऊन विजयी झाल्याचं म्हटलं गेलं. बनसोडेंनी सुशीलकुमार शिंदे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. विशेष म्हणजे पाच दशकांच्या राजकीय कारकीर्दीत शिंदेंचा हा पहिलाच मोठा पराभव होता.

त्यानंतर, सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं. सुशीलकुमार यांची कन्या आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे सोलापुरातून लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याचवेळी सुशीलकुमार शिंदे यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं. 2014 मधील लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी रिंगणात उतरण्याची इच्छा खुद्द सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली होती. 'टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

राजधानी दिल्लीत गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची अनौपचारिक बैठक झाली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस उमेदवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. नवोदितांना संधी देण्यासाठी पंचाहत्तरी पार केलेल्या ज्येष्ठांनी निवडणूक लढवू नये, याविषयी चर्चा झाली होती, मात्र सुशीलकुमार शिंदेंना सोलापुरातून प्रतिष्ठा पणाला लावायची असेल, तर हा नियम त्यांना लागू करु नये, असं बैठकीत ठरलं.

वय नव्हे, गुणवत्ता हाच उमेदवारीचा निकष असेल, हा काँग्रेसचा नियम आहे. ज्यांना विजयाची खात्री आहे, त्यांना वयाची फूटपट्टी न लावता तिकीट द्यावे, असं बैठकीत ठरल्याची माहिती आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे पुन्हा खासदारपदी विराजमान होणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.