मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ड्रग्ज कनेक्शनबाबत तपास करत आहे. परवा सकाळीच एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या घरी धाड टाकत घराची झाडाझडती घेतली होती. त्यावेळी रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. रात्री जवळपास 10 वाजता शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना एनसीबीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर आज एनसीबीच्या टीमनं सकाळी रियाच्या घरी जाऊन रियाला समन्स बजावला आहे. आज रिया चक्रवर्तीला सकाळी 11 वाजेपर्यंत चौकशीसाठी NCB कार्यालयात जावं लागणार आहे.


शौविकच्या अटकेनंतर "अभिनंदन इंडिया... तुमच्यामुळे माझ्या मुलाला अटक झाली", असा इंद्रजीत चक्रवर्ती यांचा मेसेज ट्विटरवर सध्या व्हायरल होत आहे. अनेकांना हा शेअर देखील केला आहे. त्याखाली इंद्रजीत चक्रवर्ती यांचं नाव देण्यात आले आहे. मात्र अद्याप या व्हायरल मेसेजवर इंद्रजीत चक्रवर्ती यांनी दुजोरा दिला नाही.


या ट्वीटमध्ये लिहले आहे, "अभिनंदन इंडिया... तुमच्यामुळे माझ्या मुलाला अटक झाली. मला खात्री आहे की, पुढचा नंबर माझ्या मुलीचा असेल. त्यानंतर माहित नाही पुढचा नंबर कोणाचा असेल. तुम्ही एक मध्यमवर्गीय कुटुंब उद्ध्वस्त केलं आहे. मात्र न्याय मिळवण्यासाठी हे योग्य आहे."  जय हिंद ! या संदेशाखाली लेफ्टनंट कर्नल इंद्रजीत चक्रवर्ती आणि कंसात निवृत्त असं लिहिलं आहे.


ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास केला जात होता. याच तपासादरम्यान रिया आणि शौविकच्या मोबाईलची तपासणी केल्यावर ईडीला ड्रग्स संदर्भातले चॅट सापडले जे डिलीट करण्यात आले होते आणि हे चॅट सापडल्यानंतर या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एन्ट्री झाली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो डेप्युटी डायरेक्टर जैन यांनी आत्तापर्यंतच्या नार्कोटिक्स ब्युरोच्या कारवाईवर बोलत या प्रकरणांमध्ये अजून तपास करून रियाला आतापर्यंत चौकशीसाठी समन्स बजावले नाही आहे तसेच लवकरात लवकर तिला चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.