मनमाड: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे माजी राज्य सचिव आणि विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते व माजी आमदार कॉ.माधवराव गायकवाड यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी निधन झाले. ते 95 वर्षाचे होते. त्यांनी नमाडला राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
कॉ.गायकवाड हे राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांचे नेते होते. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे लढा उभारला. संघर्ष करून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. 1960 ते 1962 दोन वर्षे ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर 1974 साली राज्यात प्रथमच जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक झाली होती. त्यात कॉ. माधवराव गायकवाड यांना मनमाड नगर परिषदेवर जनतेतून थेट नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला.
1974 ते 1981 पर्यंत ते नगराध्यक्ष होते. 1985 साली नांदगाव-मनमाड विधानसभा मतदार संघातून निवडणूक जिंकून ते आमदार झाले. 1985 ते 1990 पर्यंत त्यांनी आमदारकी भूषवली. त्यांच्या कार्यकाळात नांदगाव तालुका हा भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा बालेकिल्ला मानला जात होता. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मनमाडसह संपूर्ण नांदगाव तालुक्यातील जनतेत शोककळा पसरली आहे. उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंकार करण्यात येणार आहेत.
माधवराव गायकवाड यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि कम्युनिस्ट नेते माधवराव गायकवाड यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. माधवराव गायकवाड यांची शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हिताशी अखेरपर्यंत बांधिलकी होती. विशेषतः प्रदीर्घ काळ चाललेल्या खंडकरी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले होते. कष्टकरी-शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक लढे उभारून जीवनभर संघर्ष केला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. राज्यातील कम्युनिस्ट नेत्यांच्या पहिल्या पिढीतील ते एक प्रमुख नेते होते, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉ.माधवराव गायकवाड यांचे निधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Nov 2018 08:53 PM (IST)
कॉ.गायकवाड हे राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांचे नेते होते. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे लढा उभारला. संघर्ष करून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. 1960 ते 1962 दोन वर्षे ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -