वर्धा : देशातील सर्वात मोठं दारुगोळा भांडार असलेल्या वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील दारुगोळा भांडारात झालेल्या स्फोटाला एक वर्ष होत आहे. मात्र यो स्फोटातील शहिदांच्या कुटुंबीयांना अजूनही सरकारकडून मदत मिळालेली नाही.

केंद्र सरकारकडून घोषणा करण्यात आलेल्या मदतीचा आधार अद्याप मिळाला नसल्याचा आरोप शहिदांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दारुगोळा भांडारात 19 जणांना वीरमरण आलं होतं. यातील फायर ब्रिगेडमध्ये काम करणारे शहीद झालेले एक जवान आर्वी, तर 5 जवान पुलगावातील रहिवासी होते.

शहीद लीलाधर चोपडे यांचं घर सध्या आर्थिक संकटात आहे. घरात शिक्षण घेत असलेल्या तीन मुली असताना करता पुरुष गेल्याने पत्नी शोभा चोपडे अनेक समस्यांना तोंड देत आहेत. सुरुवातीला मुख्यमंत्री निधीतून मिळालेल्या 5 लाख आणि ग्रॅज्युटीच्या पैशातून वर्ष लोटलं. पण पुढे शिक्षणाचा खर्च, मुलींचे लग्न आणि संसाराचा गाडा कसा चालवायचा, असे अनेक प्रश्न त्यांना पडले आहेत.

अशाच समस्या बाळू पखारे यांचं कुटुंबीय आणि अमित दांडेकर यांची पत्नी प्राची यांच्यासमोर सुद्धा आहेत. विशेष म्हणजे सरकारने अजून शहिदाचा दर्जा दिला नसल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.