मुंबई : खाजगी रुग्णालयांनी नवीन चलनासाठी आग्रही न राहता रुग्णांना तातडीने उपचार द्यावेत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा दिले आहेत. उपचार नाकारल्यास 104 आणि 108 या क्रमांकावर तक्रार करावी, असं आवाहन केलं आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारकडून तक्रार निवारण करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून आतापर्यंत तिचा 320 रुग्णांनी लाभ घेतला आहे.
केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याने खाजगी रुग्णालयात तातडीच्या उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना नवीन चलनाअभावी अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी शासकीय यंत्रणेला कार्यवाहीचे आदेश दिले होते.
शासकीय यंत्रणेकडून सर्व संबंधित रुग्णालयांना उपचार करण्यासंबंधी सुचित करण्यात आलं आहे. रुग्णांकडे नवे चलन उपलब्ध नसल्यास त्याच्या सोयीने शुल्क स्वीकारण्याबाबत रुग्णालयांनी सामंजस्याने तोडगा काढावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
इथे तक्रार करा
असहकार्य करणाऱ्या रुग्णालयाची रुग्ण तक्रार करु शकणार आहेत. पालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयांसाठी संबंधित पालिकेकडे, पालिकेव्यतिरिक्त इतर शहरी भागासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे आणि ग्रामीण भागातील खाजगी रुग्णालयांबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येऊ शकेल.
या स्तरावर तक्रारीचे निवारण न झाल्यास त्या विभागाच्या उपसंचालकांकडे दाद मागता येऊ शकेल. त्यानंतरही कार्यवाही न झाल्यास आरोग्य सहसंचालकांकडे तक्रार करता येईल. 104 आणि 108 या टोल फ्री क्रमांकावर संबंधितांना तक्रार करता येणार आहे. या तक्रारीचा तपशील जाणून घेऊन शासकीय यंत्रणेकडून त्यानुसार कारवाई करण्यात येईल.