मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 51 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि शुभचिंतक कृष्णकुंजवर दाखल झाले होते.


काही कार्यकर्त्यांनी 51 व्या वाढदिवसाच्या औचित्य साधून 51 किलोचा केक राज ठाकरे यांच्यासाठी तयार केलेला आहे. या केकवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन, ईव्हीएम मशीनला विरोध दर्शवण्यासाठी ईव्हीएमची प्रतिकृती अशा पद्धतीने हा केक सजवण्यात आलेला आहे.

वाढदिवसा निमित्तानं राज ठाकरेंनी आज सकाळी साडेनऊ वाजता सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्याआधी रात्री बारा वाजता राज ठाकरेंच्या घरी कुटुंबियांनी वाढदिवस साजरा केला. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे, आई कुंदा ठाकरे, मुलगा अमित सून मिताली, मुलगी उर्वशी यांच्यासोबत वाढदिवस साजरा केला.

दरम्यान, कालपासूनच सोशल मीडियावर देखील राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट आणि शुभेच्छा संदेशाचा महापूर पाहायला मिळाला. फेसबुक, ट्विटरवर राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हॅशटॅग ट्रेंड केले जात होते. सोशल माध्यमांवर देखील कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.