एसटी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना यापुढे 10 लाख रुपये
एबीपी माझा वेब टीम | 07 Aug 2016 03:03 PM (IST)
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस.टी. बसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचारी आणि प्रवाशांच्या कुटुंबियांना यापुढे 10 लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भात माहिती दिली. महाड दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांच्या सांत्वनासाठी चिपळूण मधील एस. टी. आगारात रावते आले होते. यापुढे एसटी अपघातात मृत्युमुखी पावलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांना डेपोमध्ये श्रद्धांजली वाहण्यात येईल, प्रवाशांच्या कुटुंबियांना यापुढे 10 लाख रुपये नुकसानभरपाई किंवा नोकरी देण्यात येईल, असं रावते यांनी स्पष्ट केलं. महाडमधील सावित्री नदीवरील दुर्घटनेत आज शोधकार्यादरम्यान दोन मृतदेह आढळले आहेत. केंबुर्लीजवळ हॉटेल नीलकमलच्या पाठीमागे एक, तर ओव्हळे गावाजवळ आज दुसरा मृतदेह सापडला. त्यामुळे मृतदेहांचा आकाडा आता 27 वर पोहचला आहे.