चंद्रपूर : व्यवस्था परिवर्तनाच्या नावावर सुरू असलेल्या नक्षल्यांच्या कथित सशस्त्र चळवळीत शहरी तरुणांना सहभागी करून घेण्याच्या नव्या रणनितीतूनच मराठा आरक्षणाच्या  (Maratha Resevation)   मुद्द्यावर नक्षल्यांनी पत्रक काढल्याचे माहिती आता पुढे येत आहे. यामागे दंडकारण्य केंद्रीय समितीचा सदस्य  कुख्यात माओवादी मिलिंद तेलतुंबडेची भूमिका असून हे पत्रक देखील त्यानेच काढल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकामध्ये ज्या सह्याद्री नावाचा उल्लेख आहे. त्या नावाचा वापर तेलतुंबडेच करतो असे जाणकारांचे म्हणणे आहे. जातीगत आरक्षणाच्या विरोध हा नक्षल्यांच्या मुख्य विचारधारेचा भाग आहे. म्हणूनच त्यांनी आरक्षणाच्या मागणीवर अधिक भर न देता व्यवस्थेविरोधात असंतोष कसा निर्माण होईल व तरुणांना कशाप्रकारे कथित क्रांतीसाठी प्रवृत्त करता येईल. हाच मुख्य उद्देश या पत्रातून दिसून येतो. त्यामुळे मराठा आंदोलनासमोर ही नवी समस्या तर निर्माण होणार नाही अशी शंका आता व्यक्त करण्यात येत आहे.


माओवाद्यांची भूमिका आरक्षण विरोधी अति डाव्या व अति उजव्या या दोन्ही विचारधारेमध्ये जातीगत आरक्षणाला मान्यताच नाही. त्यामुळे आरक्षणासंदर्भात माओवाद्यांची भूमिका कट्टर दुश्मन समजल्या अती उजव्या संघटनांशी मिळतीजुळती असल्याचे दिसून येते. या पत्रकामध्ये नक्षल्यांनी ज्या प्रकारे वाक्यप्रयोग केले आहेत त्यात मराठा समाजाला घटनात्मक मार्गाऐवजी हिंसेचा मार्ग त्यांनी सुचविला आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी मराठ्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, त्यावेळेस काही ठिकाणी हिंसक घडामोडी घडल्या होत्या. तेव्हा या आंदोलनात नक्षल्यांनी शिरकाव केला असा आरोप भाजपच्या काही नेत्यांनी केला होता. आता पुन्हा या आंदोलनावर नक्षलवाद्यांच्या कथित चळवळीचे संकट दिसून येत आहे. 


कोण आहे मिलिंद तेलतुंबडे?


यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावाचा रहिवासी असलेला मिलिंद तेलतुंबडे भीमा कोरेगाव प्रकरणात अटक करण्यात आलेले  प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा भाऊ असून त्याच्यावर देखील या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. याशिवाय जांभुळखेडा स्फोटात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. मिलिंद हा दीपक आणि सह्याद्री अशा विविध नावानी चळवळीत वावरतो. सोबतच दंडकारण्य केंद्रीय समितीचा तो सदस्य असून त्याच्यावर एक कोटीच्यावर बक्षीस आहे.


संबंधित बातम्या :


'मराठ्यांनो दलाल नेत्यांपासून सावध राहा', गडचिरोलीत नक्षलवादी संघटनेकडून पत्रक जारी