नागपूर : मैत्रिणीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. तसेच बलात्कार केल्यानंतर आरोपीने मैत्रिणीचे अश्लील फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणी सतीश रामटेके या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
फेसबुकच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी सतीशची 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीसोबत मैत्री झाली होती. आरोपीने पीडित मुलीला कुटुंबियांची ओळख करुन देतो म्हणून घरी बोलावले.
घरात कुणी नसताना त्याने पीडित मुलीला गुंगीचं औषध देत तिच्यावर बलात्कार केला आणि फोटो काढले. या फोटोच्या आधारे आरोपी पीडित मुलीला ब्लॅकमेल करु लागला आणि वारंवार तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करु लागला.
पीडित तरुणीने मात्र सतीशच्या मागणीला नकार दिला. त्यावेळी चिडलेल्या सतीशने तिला मारहाण केली. मात्र धमकी आणि मारहाणीनंतरही पीडित तरुणी आपल्याला मनमानी करू देत नसल्याचे पाहून सतीशने तिची बदनामी करण्याचे ठरवले.
त्यानंतर त्याने पीडितीचे आक्षेपार्ह अवस्थेतील महाविद्यालयातील ग्रुपवर तीचे फोटो व्हायरल केले. याप्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
तसेच महाविद्यालयाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झालेले पीडितेचे फोटो पुढे व्हायरल करू नये आणि तसं करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला.