कोल्हापूर : मटणाच्या दरवाढीवरुन कोल्हापूरकर आणि मटण विक्रेते यांच्यात वाद निर्माण झाला आहे. हा वाद आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचला आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती स्थापन करुन सोमवारी अहवाद सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापुरात मटणाचे दर सध्या 580 ते 600 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे तांबड्या-पांढऱ्या रस्स्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या कोल्हापुरातील नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे.
कोल्हापुरात जन्माला येणारं बाळ दुधाबरोबर तांबडा-पांढरा पिऊनच मोठं होतं, असं असताना वेळी योग्य दरात नागरिकांना मटण मिळणं गरजेच बनलं आहे. त्यामुळेच हा वाद मिटेपर्यंत सार्वजनिक मंडळांनी मटणाचे स्टॉल्स उभा केले आहेत. एकीकडे स्वस्त दरात मटण दिले जात होते. नागरिक गर्दी करत होते, तर दुसरीकडे पारंपरिक पद्धतीने विक्री करणाऱ्या दुकानांसमोर शुकशुकाट होता. भर रस्त्यात रांगा लावून नागरिक मटण विकत घेत होते.
जिल्हाधिकाऱ्यांकडे हा वाद पोहोचल्यानंतर त्यांनी एक समिती स्थापन केली. या समितीला सोमवारपर्यंत अहवाल देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. एका वेगळ्या विषयाला सामोरं जावं लागत असल्याचंही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलं. हा वाद फक्त कोल्हापूर शहरापुरता मर्यादित राहिला नाही. तर ग्रामीण भागातही पोहोचला. गारगोटी आणि कडगाव ग्रामपंचायतीने देखील यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 11 डिसेंबर रोजी यावर सुनावणी आहे. खाटीक समाज मात्र बकऱ्यांची आवक कमी झाल्यानं दर वाढल्याचं सांगत आहेत.
मटण कोल्हापूरकरांचा जीव की प्राण आहे. शाकाहारी कमी आणि मांसाहारी नागरिकांची संख्या कोल्हापुरात जास्त आहे. भाजीपाल्याचे दर मार्केट दरानुसार कमी-जास्त होतं असतात. मात्र आतापर्यंत आपण मटणाचे दर कधी कमी झाल्याचं ऐकलं नाही. मटणाच्या दराचा आलेख वाढतच आहे. मटणाने आता 600 रुपयांपर्यंत मजल मारल्याने कोल्हापूरकर संतापले आहेत. त्यामुळे आता जिल्हाधिकारी या वादावर काय तोडगा काय काढतात हे पहावं लागेल.