गोंदिया : गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जबरदस्त शक्कल लढवली आणि पाणीटंचाईवर मात करत गोंदिया जिल्ह्याला पाणी मिळवून दिलं. अभिमन्यू काळे यांनी पुजारी टोला धरणातून येणारे कॅनॉल जिल्ह्याला जोडले जातील अशा पद्धतीने वळवले आणि त्यामधून हे पाणी वाहत वाहत वैनगंगेच्या पात्रात पोहोचलं. अशाप्रकारे तब्बल 75 किलोमीटरचं अंतर पार करुन जिल्हाधिकाऱ्यांनी हे पाणी गोंदिया जिल्ह्याला मिळवून दिलं.


गोंदिया जिल्ह्याला पाणी मिळवून देण्यासाठीचा अभिमन्यू काळे यांचा हा प्रयत्न सहज-सोपा नव्हता. त्यामागे अथक प्रयत्न होते. पाणी मिळवण्यासाठीची त्यांची धडपड पाहून अनेक अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी त्यांना अक्षरश: वेड्यात काढले होते. मात्र अथक प्रयत्नाने 75 किमीचं अंतर पार करुन पाणी गोंदियात पोहोचलं.



अशक्य काहीच नसतं, फक्त जिद्द आणि मेहनत या गोष्टींची गरज असते, हेच गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दाखवून दिले आहे.

जेव्हा गोंदियाचे स्वत:चे हक्काचे पाणी आटू लागले, तेव्हा पाण्याचा शोध सुरु झाला. गोंदिया शहरापासून 75 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पुजारी टोला धरणात पाणी तर होते, पण धरणाचे कुठलेही कॅनॉल हे गोंदिया शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कुठल्याही यंत्रणेशी जोडलेले नव्हते. तेव्हा जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी एक आगळी-वेगळी शक्कल लढवली. त्यांनी शोध सुरु केला अश्या सुकलेल्या झऱ्यांच्या आणि नाल्यांच्या ज्यांच्या मार्फत गोंदियाला पाणी पुरवठा करणाऱ्या नदी पात्रात पाणी आणला जाऊ शकते. हे करत असताना प्रशासनातील अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी काळेंना वेड्यात काढले. पण काळेंनी आपले प्रयत्न सोडले नाहीत.



पुजारी टोला धरणातून येणारे कॅनॉल हे गोंदियाच्या 75 किलोमीटर अंतरावर आहेत. कॅनॉल छेदून नाल्यांमधून वैनगंगेच्या पात्रात पाणी आणले गेले. या नदीला आधीपासूनच उपसासिंचन योजना जोडलेली होती. नदीपात्रातून पाणी उचलून गोंदियाला पाणी पुरवठा करणाऱ्या या फिल्टरेशन प्लांटमध्ये पाणी आणून गोंदियाची तहान भागवली जात आहे.

या दरम्यान अडचणी आल्याच नाहीत, असे नाही. अनेकदा कॅनॉलला छेद देताना पाणी भलतीकडेच वाहून जात असे, तर कधी कॅनॉलच फुटण्याच्या घटना घडल्या. मात्र गोंदियाची तहान भागवायचीच या ध्येयाने पछाडलेल्या अभिमन्यू काळेंनी आपले प्रयत्न सुरुच ठेवले आणि अखेरीस यश मिळवलेच.



पाईपलाइनची सवय असणाऱ्या अनेकांनी विचारही केला नसेल की, निसर्गाचे झरे किंवा नाल्यांतून एखाद्या शहराला पाणी पुरवठा होऊ शकतो. पण अभिमन्यू काळेंनी ते शक्य करुन दाखवले आहे.

पाहा व्हिडीओ :