Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी गायब झाल्याचं पाहायला मिळत होतं. शहरी भागासह गावातही थंडी गायब झाली होती. आता नवीन वर्षाला सुरुवात होताच पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागली आहे. गायब झालेली थंडी आता हळूहळू वाढू लागली आहे. शहर आणि परिसरात मागील पंधरवड्यापासून थंडीचा कडाका गायब झाला होता. नववर्षाला प्रारंभ होताच शहरात थंडीचे पुनरागमन होऊ लागले आहे. 

Continues below advertisement


महाराष्ट्रात गारठा वाढला


राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून थंडी गायब झाली होती आणि तापमानात वाढ झाली होती. फक्त पहाटेच्या वेळी हवेत किंचित गारवा पाहायला मिळत होता आणि दिवसा उन्हाची झळ बसत होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हवेत गारवा पाहायला मिळत आहे. बुधवारी रात्रीपासूनच हवेत गारवा निर्माण झालेला जाणवत होता. गुरुवारी किमान तापमानाचा पारा 13.4 अंशांपर्यंत घसरला शुक्रवारपासून पुढील पाच ते सहा दिवस थंडी वाढणार आहे. 


अनेक जिल्ह्यात किमान तापमानात घसरण


उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगावसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत थंडीचा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवणार असल्याचे हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी सांगितलं आहे. उत्तरेतील थंडी आता महाराष्ट्राकडे सरकली असून बुधवारी रात्रीपासूनच हवेत गारवा निर्माण झालेला जाणवत आहे.


पुढील 5 दिवसासाठी थंडीचा जोर वाढणार


दरम्यान, राज्यात 3 जानेवारीपासून पुढील पाच दिवसासाठी राज्यात थंडी जाणवण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी  दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक 7 जानेवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार आहे.  तसेच, नवीन वर्षाचं स्वागत कडाक्याच्या थंडीनं होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यास पंजाबराव डख यांनी वर्तवला होता. 1 जानेवारीपासून महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. 


मुंबईतील हवेच्या दर्जात सुधारणा


गेल्या काही दिवसांपासून वाढलेले प्रचंड प्रदूषण कमी होत असल्याने मुंबईतील हवेच्या दर्जात सुधारणा होऊ लागली आहे. मुंबई महापालिकेने नियमांची काटेकोर अंमलबजावणी केल्यामुळे हा परिणाम दिसत आहे.  मुंबईत सरासरी एक्यूआय 119 आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेच्या प्रदुषणात वाढ झाली होती. मात्र, आता बोरिवली, वरळी आणि कुलाबा यांसारख्या सर्वाधिक प्रदूषित ठिकाणी हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 'समाधानकारक' म्हणून नोंदवला गेला आहे. ही मुंबईकरांसाठी समाधानाची बाब आहे. हवेची गुणवत्ता खालावल्याने बोरिवली पूर्व आणि भायखळ्यातील सर्व बांधकामे थांबवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्याचे परिणामी हवेची गुणवत्ता सुधारली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


नवीन वर्षाचं स्वागत कडाक्याच्या थंडीनं होणार, जानेवारीत कसं असेल हवामान? पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज