मुंबई : राज्यासह देशभरात सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये बोचऱ्या थंडीमुळे लोक गारठून गेले आहेत. साताऱ्याच्या वेण्णालेक परिसरात 9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. मुंबईकरही गारठले मुंबईत काल नीचांकी म्हणजे 13.6 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. त्यामुळे कधी नव्हे ते मुंबईकरही स्वेटर घालून दिसत आहेत. मुंबईकरांची आजची सकाळही थंडीनेच सुरु झाली आहे. वातावरणात गेल्या दोन दिवसांपासून असलेला गारवा आजही टिकून आहे. द्राक्षांचं नुकसान तर नाशिक जिल्ह्यातील निफाडचं तापमान तर 7.4 अंश सेल्सिअसवर आलं आहे. निफाड परिसरात द्राक्षाचं सर्वाधिक पीक घेतलं जातं. मात्र थंडीमुळे द्राक्षमण्यांची फुगवणी थांबली. त्यांना तडे गेले आहेत, यामुळे द्राक्ष निर्यात होईल की नाही याची भीती बागायतदारांमध्ये आहे. उत्तर भारतात थंडी आणि धुकं उत्तर भारतात थंडीचा कहर सुरु आहे. उत्तर पूर्व भागातील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आणि धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळतं आहे. थंडीमुळे रेल्वेची वाहतूक 17 ते 20 तास उशिराने सुरु आहे. राजधानी दिल्लीची सध्याची पहाट दाट धुकं आणि थंड वाऱ्याने होत आहे. राजस्थान, जम्मूमध्येही नीचांकी तापमान दुसरीकडे राजस्थानच्या फतेहपूरमध्ये उणे 1 पूर्णांक 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. भारतातील स्वर्ग अशी ओळख असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये नागरिक थंडीने चांगलेच गारठले आहे. श्रीनगरमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी उणे 6 पूर्णांक 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील  किमान तापमान अहमदनगर - 13 अंश सेल्सिअस सातारा - 11 अंश सेल्सिअस महाबळेश्वर - 12 अंश सेल्सिअस वेण्णालेक - 9 अंश सेल्सिअस सोलापूर - 14.6 अंश सेल्सिअस