CNG Price : महाराष्ट्रात सीएनजीच्या किंमतीमध्ये मोठी कपात होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीएनजी स्वस्त करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर ‘सीएनजी’वरील व्हॅट कपातीची वित्त विभागाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ‘सीएनजी’वरील व्हॅट 13.5 ऐवजी आता तीन टक्के झाल्याने राज्यात सीएनजी इंधन आता आणखी स्वस्त होणार आहे. नवीन दर एक एप्रिलपासून लागू होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘सीएनजी व्हॅट’ कपात निर्णयाचा टॅक्सी, ऑटो, प्रवासी वाहतूकदारांसह सामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. राज्यात सीएनजी इंधन स्वस्त झाल्याने वातावरण प्रदुषण नियंत्रणासही मदत होईल.
उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने काल जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे दि. 1 एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार आहे. याचा फायदा ऑटोरिक्शा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे. प्रदुषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा आहे. सीएनजीचे कमी झालेले नवे दर दि. 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील.
नेमकी घोषणा काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प शुक्रवारी विधिमंडळात सादर केला. राज्य सरकारने आरोग्य, शेती, उद्योग या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद केली. तसेच, सीएनजी तसेच पीएनजीवरील मूल्यवर्धित कर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता सीएनजी आणि पीएनजी स्वस्त: होणार आहे. महागाईमध्ये सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत्याच –
पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. मागील चार दिवसांत तीनवेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसला आहे. नजीकच्या काळात राज्यात पेट्रोल डिझेलवरील कर कमी होण्याची शक्यता धुसर झाली आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेल महागच होणार, असे संकेत अजित पवार यांनी दिलेत. इंधन महाग होणार म्हणूनच गॅसवरचा कर कमी केला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरचं उत्पादन शुल्क कमी केले होते. तेव्हापासून राज्यातही कर कमी करण्याची मागणी होत आहे. अर्थसंकल्पात नैसर्गिक वायूवरील कर 10 टक्के कमी करण्यात आला. पण पेट्रोल डिझेलवरील करात कोणताही बदल झालेला नाही.