Mumbai Building Collapsed : मुंबईतील कुर्ला येथे दोन दिवसांपूर्वी नाईकनगर परिसरातील चार मजली इमारत दुर्घटनेमध्ये  एकूण 19 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे,. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून यापूर्वी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडूनही 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. इमारत दुर्घटनेत मृत पावलेल्यांपैकी काही यूपी-बिहारमधीलही होते. त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमींबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मृत आणि जखमींसाठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.


 






महाराष्ट्र सरकारकडून 5 लाख, तर यूपी सरकारकडून 2 लाख, जखमींना 50 हजारांची मदत
पीडितांसाठी मदत जाहीर करताना मुख्यमंत्री म्हणाले, "मुंबईच्या कुर्ला परिसरात इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेत झालेली जीवितहानी अत्यंत ह्रदयद्रावक आहे. या दु:खाच्या प्रसंगी मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. यूपी सरकार मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख आणि जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार आहे. तर यापूर्वी या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना महाराष्ट्र सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अशी एकूण जवळपास साडेसात लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली आहे. 


एकनाथ शिंदे गटाकडून मृतांना पाच लाख
एकीकडे राज्य सरकारकडून मृतांना मदत जाहीर करण्यात आली असून दुसरीकडे एकनाथ शिंदे गट आणि आमदार मंगेश कुडाळकरांकडून मृतांना 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेमुळे आपल्याला दु:ख झाल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिली होती. 






उत्तर प्रदेश सरकार महाराष्ट्र सरकारच्या सतत संपर्कात - योगी आदित्यनाथ


या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, "जखमींवर योग्य उपचार करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार महाराष्ट्र सरकारच्या सतत संपर्कात आहे. जर त्यांच्या नातेवाईकांना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह उत्तर प्रदेशातील त्यांच्या घरी आणायचा असेल तर, यूपी सरकारकडून त्याची योग्य व्यवस्था करण्यात येईल, असे सांगण्यात आले.


निवासी इमारत मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली


मंगळवारी मुंबईतील कुर्ल्यामध्ये ही दुर्घटना घडली. नाईक म्युनिसिपल सोसायटीमध्ये एक निवासी इमारत मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. स्थानिक लोकांनी अग्निशमन दलाला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. अग्निशमन विभागाने सात ट्रक, दोन रेस्क्यू व्हॅन आणि एक रुग्णवाहिका बचाव आणि मदतकार्यासाठी पाठवली होती. अनेक दिवसांपासून या इमारत रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे.