नाशिक : नाशिकमध्ये पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस शेतकऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. गोरगरीब शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारल्यानं शेतकरी संघटनाही नाराज आहे.
माहितीनुसार गोरगरीब शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनेचा लाभ सधन आणि टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांनी घ्यायला सुरुवात केल्याचं लक्षात आलं होतं. एकट्या नाशिक जिल्ह्यात 11 हजार अशा शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेवर डल्ला मारला. त्यातल्या अनेकांना नोटिसा बजावल्या आहेत. शासनाची फसवणूक करुन लाटलेले पैसे परत करा अन्यथा गुन्हे दाखल करु असा दम जिल्हाधिकाऱ्यांनी भरला आहे.
पीएम किसान योजना माहिती
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत केंद्र सरकारकडून देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात.
सहा हजार रुपयांची ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते. हा हप्ता दरवर्षी एप्रिल, ऑगस्ट आणि डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केला जातो.
चालू आर्थिक वर्षातील दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविण्यात आले आहेत. तर आता तिसरा हप्ता सरकारकडून डिसेंबर 2020 मध्ये पाठवण्यात येणार आहे.
पीएम किसान सन्मान योजनेच लाभ घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. त्यानंतरच तुमच्या बँक खात्यामध्ये वर्षाला हप्त्यांमध्ये एकूण सहा हजार जमा होतात
सर्वच शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही अटी घालून दिल्या आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर त्यांची जमीन असली पाहिजे. जर एखादी व्यक्ती शेती करत असेल, पण त्याच्या नावावर शेतजमीन नसेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही.
याशिवाय, जर एखादी व्यक्ती शेतकरी आहे पण ती सरकारी कर्मचारी आहे किंवा सरकारी सेवेतून निवृत्त झाला आहे. तरी देखील त्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही. तसेच, एखाद्या व्यक्तीला मासिक पेन्शन 10 हजार मिळत असेल तरी देखील त्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही.
रजिस्ट्रेशन कसे कराल
दरम्यान, पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना आपल्या नावाचे रजिस्ट्रेशन करावे लागते. यासाठी https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन Farmer corner टॅबवर क्लिक करुन रजिस्टेशन करायचं असतं
https://pmkisan.gov.in या वेबसाइटवर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या यादीमध्ये तुमचे नाव आहे का? हे देखील तपासू शकता.
Farmer corner टॅबवर new registration वर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर तुमचा आधार नंबर अपलोड केल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल.
ओपन झालेल्या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये शेतकऱ्यांना नाव, जेंडर, श्रेणी, बँक खाते क्रमांक, IFSC कोड, पत्ता, मोबाइल नंबर, जन्म तारीख इत्यादी माहिती द्यावी लागेल. याशिवाय, शेतकर्यांना जमिनीचा सर्व्हे किंवा खाते क्रमांक, खसरा क्रमांक, जमीन क्षेत्र इत्यादींची माहिती द्यावी लागेल.
रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती भरून झाल्यावर सेव्ह पर्यायावर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट करा. त्यानंतर या फॉर्मची एक प्रिंट तुमच्याकडे ठेवा.
याचबरोबर, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर अर्ज करताना झालेल्या चुका सुधारता येतात. वेबसाइटवरील फार्मर कॉर्नरवर जा आणि त्याठिकाणी Edit Aadhaar Details वर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा योग्य आधार नंबर टाकता येईल. जर तुमचे नाव चुकीचे असेल किंवा आधारवरील नावाशी जुळत नसेल तर ही चूक देखील सुधारता येतेय. आणखी मदतीसाठी तुम्ही लेखपाल किंवा कृषी विभागाशी संपर्क करू शकता.