पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहर आणि वाहनांची तोडफोड हे समीकरण तसं गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे. फक्त या तोडफोडीमागचं कारण बदलत राहतं. कधी दोन गटातील भांडणातून, कधी वर्चस्वासाठी तर कधी दहशत निर्माण करण्यासाठी ही तोडफोड झाल्याचं समोर आलं आहे. पण आजचं कारण हे धक्कादायक आहे. बहिणीने प्रेम विवाह केला, या रागातून अल्पवयीन भावाने बारा वाहनांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी एकाला अटक तर एकास ताब्यात घेतलं आहे.


चिंचवडच्या वेताळनगरमधील एका तरुणीचे शेजारच्याच एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. मंगळवारी (27 ऑक्टोबर) या दोघांनी एका मंदिरात जाऊन प्रेम विवाह केला. ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरली. तरुणीचा अल्पवयीन भाऊ मात्र यामुळे चांगलाच संतापला. भाऊ उचापती असल्याने काहीतरी विपरीत घडण्याची शक्यता काहींना होती आणि रात्री साडे अकराच्या सुमारास अचानक जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा सर्व नागरिक बाहेर आले तर प्रेम विवाह केलेल्या बहिणीचा भाऊ टोळक्यासह धिंगाणा घालत असल्याचं दिसलं. हातात तलवार आणि कोयते नाचवत या टोळक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड सुरू केली. दिसेल त्या वाहनांवर प्रहार केला गेला. बघता-बघता रिक्षा, तीनचाकी मिनी टेम्पो आणि दुचाकी अशा बारा वाहनांना त्यांनी लक्ष्य केली.


हा धुडगूस पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाली. हे पाहून अल्पवयीन भाऊ आणि टोळक्याने तलवार आणि कोयते हवेत फिरवू लागले. जोरजोरात ओरडत सर्वांना धमकावू लागले. तातडीनं घरात जा नाहीतर कोणाचीच खैर नाही. असं म्हणून नागरिकांमध्ये दहशत ही पसरवली आणि काहीवेळाने ते सगळे तिथून पसार झाले. वाहनांचं नुकसान झालेल्यांनी चिंचवड पोलिसांकडे तक्रार केली.


पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून उचापती भावाचा शोध सुरू केला. आत्तापर्यंत चिंचवड पोलिसांनी एकास अटक तर एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले आहे. वाहन तोडफोडीच्या या कारणामुळे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना देखील धक्का बसला.