मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिका हद्दीतील 500 वर्ग फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांसाठी मालमत्ता कर माफ केला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी राजधानी दिलेला न्याय ते उपराजधानी नागपुरला का लागू करत नाही असा प्रश्न विचारत काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. मुंबईमधील अल्प मध्यम वर्गीय व मध्यमवर्गीय कुटुंबियांना दिलासा देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र नागपुरातही असे हजारो कुटुंब आहे ज्यांना अशाच निर्णयाची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी नागपूरकरांना ही दिलासा द्यावा अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे. गेल्या काही वर्षात नागपूर शहरात आजूबाजूच्या ग्रामीण भागातून हजारो कुटुंब नागपुरात स्थायिक झाले आहे. त्या सर्वांचे घर 500 वर्ग फूट पेक्षा कमी आकाराचे असून त्यांना मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा अशी आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अशी मागणी केली आहे.
जेव्हा वचन दिलेत तेव्हा पासून 500 चौ. फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करा!- आशिष शेलार
आतापासूनच नव्हे तर वचन दिलेत त्या तारखे पासून 500चौरस फुट घरांचा मालमत्ता कर पुर्ण माफ करा अशी मागणी करीत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी, आता सत्तेची खुर्ची डळमळीत झाली म्हणून शिवसेनेला मुंबई"करां"ची आठवण झाली असा टोलाही लगावला आहे. मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात येत असल्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, या निर्णयाला एवढा उशीर का झाला? गेली चार वर्षे का निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आतापासून नको तर मागिल चार वर्षांचा कर ही मुंबईकरांना परत करा. जेव्हा वचन दिलेत तेव्हा पासूनची करमाफी करा अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की, मुंबईतील अती श्रीमंत सोडून ज्या मध्यमवर्गीयांची घरं 500 चौ. फु. पेक्षा मोठी आहेत, त्यांचाही 500चौ. फु. पर्यंतचा कर माफ करा. म्हणजे ज्या मध्यमवर्गीय मुंबईकरांची घरे 600,650, 700 चौरस फुटाची आहेत त्यांचाही 500 चौरस फुटापर्यंत कर माफ करा व त्यापेक्षा जास्त असलेल्या क्षेत्रफळाचाच कर त्यांना आकारण्यात यावा. यासोबतच 500 चौ. फु.पर्यंतच्या दुकानदारांही हीच सुट देणार का? ज्यांचा मुंबईत फुलांचा, भाजीचा, केशकर्तनालय, फळे सारख्या व्यवसाय करणारा छोटा व्यापारी आहे, त्याच्या गाळ्याचा 500 चौ. फुटापर्यंतचा कर माफ करा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.
करातून दिलेली माफी राज्यातील इतर महानगरपालिकांसाठी लागू करावी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री असून त्यांनी मुंबईच्या नागरिकांना मालमत्ता करातून दिलेली माफी राज्यातील इतर महानगरपालिकांसाठी ही लागू करावी अशी मागणी भाजपने केली आहे. सरकार हे संपूर्ण राज्यासाठी असते. सरकार फक्त मुंबई महानगरपालिकेची नसते. त्यामुळे जे न्याय मुंबई महानगरपालिकेतील 500 वर्ग फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांसाठी करण्यात आला आहे. तोच न्याय नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, पिंपरी चिंचवड अशा इतर महानगरपालिकांसाठी ही करण्यात यावा अशी मागणी भाजपाचे नागपूर शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी केली आहे. नागपूर शहरात 500 वर्ग फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाचे घर असलेले सुमारे 2 लाख 60 हजार कुटुंब आहेत. त्यांच्या मालमत्ता कराच्या माफीसाठी दरवर्षी 29 ते 34 कोटी रुपयांचा अनुदान लागणार असून तो अनुदान राज्य नागपूर महानगर पालिकेला द्यावा अशी मागणीही दटके यांनी केली आहे.. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे वजनदार मंत्री आहेत. ते आपल्या विभागामार्फत असा निर्णय करून सर्व राज्यातील गरीब कुटुंबाना न्याय मिळवून देतील अशी अपेक्षाही दटके यांनी व्यक्त केली. जर मुख्यमंत्र्यांनी नागपूरसह इतर महानगरपालिकासाठी मालमत्ता करात माफीचा निर्णय लवकर घेतला नाही तर भाजपला आंदोलनात्मक भूमिका स्वीकारावी लागेल असा इशाराही दटके यांनी दिला आहे.
इतर महत्वाचा बातम्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha